कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:11+5:302021-06-23T04:21:11+5:30
आबलोली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्याला ग्रामकृती दलासह अर्ध्या तासाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रत्येक गावाचा आढावा ...
आबलोली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्याला ग्रामकृती दलासह अर्ध्या तासाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रत्येक गावाचा आढावा व असणाऱ्या समस्या समजून घेऊन चर्चा करणे गरजेचे होते, मात्र, तसे झाले नसल्याचे ग्राम संवाद सरपंच संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप आर्यमाने यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काेराेनामुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे़.
आपला जिल्हा हा पूर्णपणे कोरोनामुक्त करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावातील ग्रामकृती दल व ग्रामपंचायत यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ग्रामपंचायतींना स्थानिक पातळीवर निर्णय घेता आला, तरच आरोग्य विभागावरील येणारा ताण कमी होईल. प्रत्येक गाव कोरोना मुक्त होईल परिणामी आपला रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होईल. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत व ग्रामकृतीदल यांना देण्यात आलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन होत आहेच, परंतु कर्तव्यांसोबत अधिकारही तितकेच देणे गरजेचे आहेत. प्रत्येक गावातील स्थानिक परिस्थिती ही त्या-त्या ग्रामपंचायत व ग्रामकृतीदल यांनाच माहिती असते. आवश्यकता भासल्यास गावाच्या सीमा बंद करणे, बाजारपेठा सुरू ठेवणे-बंद ठेवणे, वाहतूक नियंत्रित ठेवणे अशाप्रकारचे अधिकार तसेच गाव कोरोनामुक्त करण्याच्या अनुषंगाने सर्व ते अधिकार प्रत्येक ग्रामपंचायतीला देणे गरजेचे आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
तसेच १०० टक्के लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रथम पहिला डोस देऊन प्रत्येक गाव पूर्ण होणे गरजेचे आहे. मगच दुसरा डोस देणे योग्य ठरेल. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्पर्धा जिंकणे या हेतूपेक्षा प्रत्येक गाव कोरोनामुक्त करणे हा हेतू आहे. ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या माध्यमातून काम करीत असताना प्रत्येक ग्रामपंचायतीकडून योग्यप्रकारे काम केले गेले आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ यामध्ये कामकाज करण्यासाठी व प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी अधिकार द्यावेत, जेणेकरून आपला जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी मागणी प्रमेय प्रदीप आर्यमाने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.