कडवईची ग्रामसभा विविध विषयांवर वाजली
By admin | Published: December 1, 2014 09:32 PM2014-12-01T21:32:12+5:302014-12-02T00:29:36+5:30
ग्रामस्थ आक्रमक : गावविकास आराखडा तयार करताना स्थानिकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा विविध विषयांवर चांगलीच वाजली. या ग्रामसभेला संगमेश्वरच्या सभापती मनीषा गुरव, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य संतोष थेराडे हे उपस्थित होते. या ग्रामसभेत घरकुल, पर्यावरण विकास आराखडा तसेच वाढीव घरपट्टी या विषयांवर वादग्रस्त चर्चा झाली.
कडवई ग्रामपंचायत कार्यालय येथे ऐश्वर्या घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेला पर्यावरण विकास आराखडा तयार करणाऱ्या सातारा येथील संस्थेचे सभासद हजर होते. २०१० साली या संस्थेची नियुक्ती कडवई गावचा विकास आराखडा तयार करण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, या संस्थेने ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा आराखडा तयार केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळे या संस्थेला आवश्यक असणारा ग्रामसभेचा ठराव देण्यास ग्रामस्थांनी स्पष्ट नकार दर्शवला. पंचायत समिती सदस्य संतोष थेराडे यांनी हा ठराव देण्याची विनंती ग्रामस्थांना केली. मात्र, वॉर्डसभा झाल्याखेरीज ठराव न देण्याचे स्पष्ट मत ग्रामस्थांनी मांडले.
घरकुल योजनेत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे मत ग्रामस्थांनी सभापतींसमोर मांडले. ज्यांना खरोखरच निवाऱ्याची आवश्यकता आहे, अशा लोकांना घरे न मिळता धनदांडगे लोक या योजनेचा लाभ घेत असल्याचे ग्रामस्थांनी उघड केले. यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन सभापती मनीषा गुरव यांनी ग्रामसभेत दिले.
कडवई परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार होत असून, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. याच सभेमध्ये शिंदेआंबेरी येथील खसासेवाडी स्मशानभूमीचे काम न करता रक्कम अदा झाल्याची बाब ग्रामस्थांनी मांडली. यावर ग्रामविकास अधिकारी विनायक राजेशिर्के यांनी स्मशानाच्या आराखड्याची रक्कम अदा झाली असल्याचे सांगितले. मात्र, काम न करता रक्कम का अदा करण्यात आली, याचे समाधानकारक उत्तर त्यांना देता आले आही.
काम पूर्ण असल्याचा दाखला बांधकाम विभागाने दिल्याने ही रक्कम अदा केली असल्याचे आश्चर्यकारक उत्तर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. काम न करता काम पूर्ण झाल्याचा दाखला देऊन रक्कम अदा होत असेल तर हा जनतेच्या पैशांचा अपहार आहे, असा आक्षेप ग्रामस्थांनी नोंदवला. याची चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई व्हावी, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. फौजदारी कारवाईवर ग्रामस्थ मागणीवर ठाम राहिल्यानंतर अखेर हा ठराव संमत करण्यात आला. दोन सभापतींच्या उपस्थितीत झालेली ग्रामसभा विविध विषयांवर चांगलीच गाजली. (वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेबद्दल औत्सुक्य होते. यावेळी गाव परिसरातील अनेक विषयांवर चर्चा झाली असली तरी धनदांडग्यांनी गरिबांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेऊ नये, असे मत व्यक्त करण्यात आले. विकास आराखडा, बिबट्याचा बंदोबस्त, घरकूल हे विषय टिपेचे ठरले.
विशेष ग्रामसभा गाजली ती घरकूल, पर्यावरण विकास आराखडा या विषयांवर.
सातारच्या संस्थेबाबत ग्रामस्थांचा आक्षेप.
विश्वासात न घेता आराखडा तयार केल्याचे म्हणणे.
गरजू लाभार्थींपर्यंत घरकूल योजना पोहोचली नसल्याची खंत.
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी.