ग्रामसेवकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले, असहकार आंदोलन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:21 PM2019-03-06T12:21:09+5:302019-03-06T12:24:13+5:30
कोणतीही पुर्वसूचना न देता ग्रामसेवकांचे गेल्या दोन महिन्यांचे पगार अदा करण्यात आलेले नाहीत. यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा, संगमेश्वरने पंचायत समिती प्रशासनाशी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ५ रोजी ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीमध्ये ग्रामसेवकांनी आढावा देण्याचे नाकारून आपले आंदोलन सुरू ठेवले.
देवरूख : कोणतीही पुर्वसूचना न देता ग्रामसेवकांचे गेल्या दोन महिन्यांचे पगार अदा करण्यात आलेले नाहीत. यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा, संगमेश्वरने पंचायत समिती प्रशासनाशी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ५ रोजी ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीमध्ये ग्रामसेवकांनी आढावा देण्याचे नाकारून आपले आंदोलन सुरू ठेवले.
पंचायत समितीच्या आढावा बैठकीला कोणताही आढावा, कोणत्याही नोंदी देण्यात येऊ नयेत, असे आदेश जिल्हा संघटनेकडून संगमेश्वर तालुका संघटनेला मिळाले होते. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी मंगळवारी बोलावलेल्या ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत ग्रामसेवकांनी आढावा देण्यास नकार दिला. त्यामुळे ही आढावा बैठक होऊ शकली नाही.
ग्रामसेवकांना गेल्या दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनांनी आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे. मात्र, ही आंदोलनाची भूमिका घेताना ग्रामस्तरावरील काम सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण भागातील कोणाचीही अडचण होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे ग्रामसेवकांनी नमूद केले.
मात्र, पंचायत समिती प्रशासनाशी असहकार ठेवल्यामुळे घरकुलांना मंजुरी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीची कामे, जनसुविधेंतर्गत असलेली कामे, २५-१५ टक्के योजनेंतर्गत कामे आदी कामांच्या मंजुरीबाबत आणि त्यांच्या अंमलबजावणीला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आचारसंहितेपूर्वी विकासकामांना मंजुरी व त्याची अमलबजावणी होणे क्रमप्राप्त बनले आहे. मात्र, ग्रामसेवक संघटनांनी पंचायत समिती, तालुका प्रशासनाला कोणतीच माहिती द्यावयाची नाही, अशी भूमिका स्वीकारल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या असहकार आंदोलनाचा तिढा सोडवणे गरजेचे बनले आहे.
अन्यथा विकासकामांवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नसल्याचे मत ग्रामसेवक संघटना शाखा, संगमेश्वरचे अध्यक्ष ई. डी. करंबेळे, उपाध्यक्ष विजय पाटील, सचिव शेखर जाधव, खजिनदार मेघा सुवारे, जिल्हा संघटक सुहास शिंदे, राज्य कोकण विभाग अध्यक्ष एन. एस. पवार आदी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. आपला पगार तत्काळ न झाल्यास हे आंदोलन उग्ररूप धारण करेल, असा गर्भित इशारा प्रशासनाला दिला आहे.