धान्य वाटप पाॅस मशीनद्वारे करण्याची परवानगी मिळावी : अशोक कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:10+5:302021-04-18T04:31:10+5:30
अडरे : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना महामारीचे संकट संपेपर्यंत धान्य दुकानदारांना स्वतःच्या अंगठ्याने धान्य वाटप पॉस मशीनद्वारे करण्याची परवानगी मिळावी, ...
अडरे : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना महामारीचे संकट संपेपर्यंत धान्य दुकानदारांना स्वतःच्या अंगठ्याने धान्य वाटप पॉस मशीनद्वारे करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शासन- प्रशासनासमोर कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे, तर दुसरीकडे गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना परिस्थितीनंतर रेशनिंग दुकानदार संघटनेने काही मागण्या शासनाकडे केल्या होत्या. या मागण्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रास्त धान्य दुकान मालक - चालक रॉकेल एजन्सीधारकांना विमा संरक्षण व्हावे याचबरोबर कोकण विभागीय वरिष्ठ उपायुक्तांकडून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना रेशन दुकानदारांसाठी हॅन्डग्लोज, मास्क, सॅनिटायझरचे पुरवठा होण्यासंदर्भात आदेश व्हायला पाहिजे होते, ते आदेश अद्याप झालेले नाहीत. तसेच शासन प्रशासनाकडून पारदर्शकपणाची अपेक्षा ठेवली जाते. मात्र, कमिशन देण्याबाबत पारदर्शकता ठेवली जात नाही. एकंदरीत धान्य दुकानदारांना मिळणारे धान्य विक्रीचे कमिशन वेळेत मिळावे, अशी मागणी अशोक कदम यांनी केली आहे.
कमिशन वेळेत मिळत नसल्यामुळे रेशन दुकानदारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे नमूद केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाच्या वतीने देण्यात आलेली ई-पॉस मशीन मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त होत आहेत. त्याचबरोबर मशीनच्या बॅटऱ्यादेखील नादुरुस्त होत आहेत. याबाबत वारंवार मागणी करूनही मशीन अथवा बॅटऱ्यांबाबत निर्णय झालेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.