४२,८२९ निराधार व्यक्तींचे अनुदान खात्यावर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:12+5:302021-05-09T04:33:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाच्या निराधार निवृत्तीवेतन योजना विभागाच्या पाच विविध निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना शासनाने एप्रिल आणि मे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाच्या निराधार निवृत्तीवेतन योजना विभागाच्या पाच विविध निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना शासनाने एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे प्रत्येकी एक असे एकूण दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगावू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लाभार्थ्यांची रक्कम पोस्टात जमाही झाली आहे. मात्र, काही भागात पाेस्टमन न गेल्याने अद्याप रक्कम या लाभार्थ्यांपर्यंत पाेहोचलेलीच नाही. त्यामुळे आगावू लाभ मिळूूनही या निराधारांचे डोळे वेतनाकडे लागून राहिले आहेत.
विशेष योजनेच्या लाभार्थ्यांना लाॅकडाऊन काळात शासनाने दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य आगाऊ दिले आहे. कोरोना काळात या व्यक्तींना बाहेर पडायला लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील पोस्ट कार्यालयाला या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन हातात पैसे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे पैसे गेल्या महिन्यात जमा झाले आहेत. मात्र, काही भागात अजूनही पोस्टमन गेले नसल्याने या लाभार्थ्यांना अजूनही आपल्या हक्काच्या या पैशांपासून वंचित रहावे लागले आहे.
कोरोना काळात या लोकांचे वेतन मध्यंतरी नियमित झाले होते. मात्र, आता येऊनही त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
विशेष योजनेच्या सर्व निराधारांचे निवृत्तीवेतन शासनाकडून आले असून ते तालुकास्तरावर पाठविण्यात आले. त्यानुसार ही कोषागार कार्यालयाकडून थेट त्यांच्या खात्यातही पैसे जमा झाले आहेत. लाॅकडाऊन काळात पोस्टाने त्यांच्यापर्यंत पोहोचून ही रक्कम त्यांना द्यावी, अशा सूचना जिल्हास्तरावरून तालुक्यातील पोस्ट कार्यालयांनाही दिल्या आहेत.
- राजश्री मोरे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन
आम्हाला कुणाचा आधार नाही. त्यामुळे शासन देईल, त्यावर आमची गुजराण सुरू आहे. पण अजूनही माझे पैसे मिळाले नाहीत.
- आनंदी राडे, लाभार्थी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना
लाॅकडाऊनच्या काळातही शासनाने दिव्यांगांचा विचार करून दोन महिन्यांसाठी दोन हजार रुपयांची मदत केली आहे. ही रक्कम मला मिळाली.
- मुश्ताक मालाणी, लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना
लाॅकडाऊनच्या काळात अडचण होणार नाही, यासाठी शासनाकडून दोन महिन्याचे प्रत्येकी एक हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली आहे.
- केशव कांबळे, लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना
शासनाकडून आलेले पैसे पोस्टातून मिळाले. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात माझ्या दोन मुलांची गुजराण होत आहे. या पैशांमुळे अडचणीच्या वेळी माझे कुटुंब सावरले आहे.
- ललिता करंबेळे, लाभार्थी, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना
मी निराधार आहे. त्यामुळे शासनाच्या आर्थिक मदतीवर माझी गुजराण होते. लाॅकडाऊनमध्ये शासनाने मदत केली म्हणूनच वेळेवर मला पैसे मिळाले, त्याबद्दल शासनाचे आभार.
- पांडुरंग वारे, लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना
शासनाचा दिलासा पण...
शासनाने लाॅकडाऊनच्या काळात निराधार लोकांना दोन महिने प्रत्येकी हजार रुपयांची मदत केली आहे. बहुतांश जणांना ते मिळालेही. मात्र, काही वृद्ध असल्याने पोस्टमनवर विसंबून आहेत. त्यांच्यापर्यंत अद्याप पाेहोचलेले नाहीत.
या लाभार्थ्यांना थेट पैसे मिळावे, यासाठी रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशनने पाठपुरावा केला.