ड्रॅगन फ्रूट लागवडीला चालना देण्यासाठी अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:27+5:302021-07-27T04:32:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ड्रॅगन फ्रूट लागवडीला चालना देण्यासाठी कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुदान देण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ड्रॅगन फ्रूट लागवडीला चालना देण्यासाठी कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुदान देण्यात येणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
ड्रॅगन फ्रूट हे निवडुंग परिवारातील महत्त्वपूर्ण फळ असून या फळात पोषक तत्त्व आणि अॅॅन्टीऑक्सिडेंन्ट भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे या फळास ‘सुपर फ्रूट’ म्हणून ओळखले जाते. या फळात विविध औषधी गुण आहेत. या व्यतिरिक्त फॉस्फरस व कॅल्शियम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरीही झाडे मात्र तग धरतात. शिवाय या पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नसल्याने पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेत या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मूल्य बाबी लक्षात घेऊन २०२१-२२ या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केले आहे.
-----------------------------
ड्रॅगन फ्रूट फळ पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये ३ मीटर बाय ३ मीटर, ३ मीटर बाय २.५ मीटर या अंतरावर खड्डे खोदून खड्ड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रिटचा किमान ६ फूट उंचीचा खांब व त्यावर काँक्रिटची फ्रेम बसवावी. सिमेंट काँक्रिट खांबाच्या एक बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावता येतात. ड्रॅगन फ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी ४ लाख प्रतिहेक्टर प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून ४० टक्क्यांप्रमाणे रक्कम १ लाख ६० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. ड्रॅगन फ्रूटचे अनुदान तीन वर्षांत ६०:२०:२० या प्रमाणात देण्यात येणार आहेत. दुसऱ्या वर्षी ७५ टक्के व तिसऱ्या वर्षी ९० टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील. ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.