पिकांच्या रक्षणासाठी गावोगावी गवताची माची

By admin | Published: September 9, 2016 12:02 AM2016-09-09T00:02:16+5:302016-09-09T01:13:26+5:30

वन्य प्राण्यांपासून नुकसान : रात्रंदिवस शेतकऱ्यांचा पहारा

The grasshopper for the protection of crops | पिकांच्या रक्षणासाठी गावोगावी गवताची माची

पिकांच्या रक्षणासाठी गावोगावी गवताची माची

Next

सुभाष कदम --- चिपळूण तालुक्यात रानडुक्कर व इतर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे आजही ग्रामीण भागात वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गवताची माची करुन रात्रंदिवस शेतकरी पहारा करीत असतात.
खरीपाच्या हंगामात कोकणात राबराब राबून भातपीक घेतले जाते. लहरी हवामान, वेळीअवेळी पडणारा पाऊस यामुळे वारंवार पिकाचे नुकसान होत असते. पावसाळ्यात खेकडे रोपांची नासधूस करतात. तर त्यानंतर तयार झालेली शेती रानडुक्कर, वानर किंवा तत्सम प्राणी मातीमोल करतात. घरापासून दूरवर असलेल्या शेतात पीक तयार झाले की त्याचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना झाडावरच खोप काढून त्यात रात्रंरात्र जागून काढावी लागते.
यावेळी लांब रस्सीला डबे बांधून किंवा फटाके वाजवून वन्यप्राण्याला पळवून लावले जाते. काही ठिकाणी साड्या बांधण्यात येतात किंवा बुजगावणे उभे केले जातात.
आजही ग्रामीण भागात शेती संरक्षणासाठी सहजतेने शस्त्र परवाना मिळत नाही. अनेकांना गरज असतानाही पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने विनंती करुनही शस्त्र परवाना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आजही अशा दिव्यातून जावे लागत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. मग, यावर विविध उपाययोजना करून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसतात. शेतीच्या संरक्षणासाठी सरकार मदत करत नाहीच पण नुकसान भरपाईही देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्याला बारमाही शेतात राबावे लागते. शेती संरक्षणासाठी माचीत बसताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. शासनाने याचा विचार करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत तरतूद करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

पीक वाया जाते
वन्य प्राण्यांचा धोका पिकाला असतो. अनेकवेळा हाताशी आलेले पीक वाया जाते. शासनाकडून शेतीसाठी नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यालाच दिवसरात्र शेताची राखण करावी लागते. त्यासाठी विविध उपाययोजना शेतकरी करीत असतो, असे कुटरे कवडेवाडी येथील मनोहर कवडे व अरविंद कवडे यांनी सांगितले.
दुष्टचक्राचा फेरा
हवामानाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कमी पावसामुळे वाया जाणारे पीक तर कधी अधिक पडणाऱ्या पावसाचा फटका यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच वन्यप्राण्यांचा त्रास होत आहे.

नुकसान भरपाईची मागणी
निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी अजूनही शेती करणे बंद केलेले नाही. संकटांचा सामना करत शेतकरी भातशेतीचे उत्पादन घेत आहेत. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

Web Title: The grasshopper for the protection of crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.