कित्येक दशकांतील महाप्रलय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:18+5:302021-07-25T04:26:18+5:30
बुधवारी रात्री पावसाचा जोर अधिकच वाढला. हवामान खात्याचा अंदाज यावेळी तंताेतंत हाेता. दि. २० ते २२ जुलै या कालावधीत ...
बुधवारी रात्री पावसाचा जोर अधिकच वाढला. हवामान खात्याचा अंदाज यावेळी तंताेतंत हाेता. दि. २० ते २२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी पाऊस अक्षरश: बदाबदा कोसळत होता. बुधवारी रात्री तर काळरात्र असल्यासारखी ढगफुटी झाली. कमी वेळात कोसळलेल्या पावसामुळे काही वेळातच अवघा चिपळूण परिसर जलमय झाला. २००५ मधील महापुरापेक्षाही जास्त पाणी चिपळूण शहरात शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली. तोपर्यंत फारतर पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरेल, असा नागरिकांचा कयास होता. मात्र, अवघ्या काही मिनिटातच पाण्याचा वेढा वाढला. दुसऱ्या मजल्यापर्यंत म्हणजे अगदी दहा-बारा फुटांपेक्षाही पाणी वर चढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जो-तो आपल्याला, आपल्या घरातल्यांना आणि त्याचबरोबर घरातील वस्तूंना वाचविण्याचा प्रयत्न करू लागला. पाणी जसजसे वर चढू लागले, तसतसे वस्तूंपेक्षाही माणसांचा जीव महत्त्वाचा असल्याने माळ्यावर, पोटमाळ्यावर, टेरेसवर जाऊन बचाव करण्याचा प्रयत्न करू लागले. सगळेच पाण्याच्या वेढ्यात असल्याने मदतीला कुणाला बोलावणार?
यापूर्वी २००५ साली येथे महापुराने सर्वाधिक उंची गाठली होती. मात्र, त्यावेळी निश्चित केलेली पूररेषा या महापुराने ओलांडली. अनेकांची घरे पाण्याखाली गेली. इमारतींचे तळमजले बुडाले, काहींच्या दुसऱ्या मजल्यापर्यंतही पाणी भरले. बाजारपेठेत साधारण आठ फुटापर्यंत पाणी वाढले, त्यामुळे सर्व दुकानांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. पहाटे ३ वाजल्यापासून येथे ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळत असल्याने पहाटेपासूनच शहरात झपाट्याने पाणी वाढू लागले. त्यानंतर शहरातील वाशिष्ठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे या नदीकाठावरील पेठमाप, मुरादपूर, मार्कंडी, परशुराम नगर या भागातही पुराचे पाणी शिरले. यापूर्वी कधीही मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी आले नव्हते. मात्र, प्रथमच महामार्गावरही पाणी आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली. कोकण रेल्वेचा मार्गही बाधित झाल्याने रेल्वे विविध स्थानकांवरच थांबविण्यात आल्या.
त्यातच कोळकेवाडी धरण परिसरातही कमी कालावधीत प्रचंड पाऊस झाल्याने या धरणाचे चार दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे चिपळूणबरोबरच खेर्डी बाजारपेठेतही दहा फुटापर्यंत पुराचे पाणी वाढले. त्यामुळे या भागातही अनेक घरे पाण्याखाली गेली. कऱ्हाड मार्गही बंद पडला, विद्युत पुरवठा ठप्प झाला, पुरात अनेक वाहने वाहून गेली, काही एकमेकांवर आपटली. त्यामुळे वाहनांचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले.
चिपळूण नगर परिषद व महसूल विभागातर्फे नागरिकांना बुधवारी रात्रीच सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पहाटे ३.३० वाजता नगर परिषदेने सलग चारवेळा भोंगा वाजवून नागरिकांना सावधानतेचा इशाराही दिला होता. मात्र, त्यानंतर तितक्याच वेगाने पाणी वाढल्याने अनेकजण अडकून पडले. चिपळूण आणि खेर्डी येथील सुमारे ६० हजार नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते.
गुरूवारी दुपारपर्यंत चिपळुणात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एन. डी. आर. एफ.) जवानांसह कोणतीही यंत्रणा पाेहोचली नव्हती. त्यामुळे अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था धावल्या. मात्र, वरून पाऊस आणि पुराचे वाढलेले पाणी यामुळे सहाय्य करताना अनेक अडचणी येत होत्या. मदतकार्यासाठी सहा खासगी, पोलीस तसेच कस्टम खात्याची प्रत्येकी १, नगर परिषदेच्या २ तर तहसील कार्यालयाच्या पाच अशा १५ बोटी तैनात करण्यात आल्या होत्या. अखेर दाखल झालेली प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी १५ बोटींच्या सहाय्याने मदतकार्याला सुरूवात केली. नागरिकांना वाचविण्यास सुरूवात केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुरातून सुटका केलेल्यांचे सावर्डे येथील शैक्षणिक संस्था तसेच अन्य उंच ठिकाणी स्थलांतर करून तेथेच त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. चिपळूण शहरासह आसपासची सात गावे पुराच्या विळख्यात सापडली. संपूर्ण बाजारपेठच पाण्याखाली असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाऊस थकला आणि मग यंत्रणा आणि त्यांच्या मदतीला गेलेले सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने मदतकार्याला वेग आला. त्यामुळे अनेकांची सुटका करता आली. यात रूग्ण, वृद्ध, बालके, महिला यांचा समावेश अधिक हाेता.
पुरातून सुटका झाल्यानंतरही अनेकांना २४ तास प्यायला पाणी आणि खाणे मिळालेले नव्हते. मात्र, चिपळूण येथील संस्था मदतीसाठी पुढे धावल्या. रत्नागिरीतील हेल्पिंग हॅंड्समध्ये असलेल्या संस्थांमधील काही संस्था तातडीने मदत घेऊन चिपळुणात धावल्या आणि त्यांनी विविध वस्तूरूपात मदतीचे वाटप करण्यास सुरूवात केली.
आता चिपळुणात पाऊस ओसरला असला, तरीही सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पुराने सारे काही ओरबाडून नेले आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने घर उभे करण्याचे कष्टप्रद आव्हान उभे ठाकले आहे. यासाठी शासनाकडून कधी मदत मिळेल तेव्हा मिळेल, ती किती मिळेल, याचीही कल्पना नाही. मात्र, तरीही चिपळुणातील नागरिकांनी उभारी घेत कोलमडलेली, उद्ध्वस्त झालेली घरे पुन्हा उभी करण्यासाठी नव्या उमदीने उभे राहायला हवे.
सामाजिक संस्थांचे योगदान
रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनियर्स, जिद्दी माऊंटेनियर्स, देवरुखमधील राजू काकडे हेल्प अकादमी या संस्थांचे सदस्य, पोलीस यंत्रणेचे जवान तातडीने चिपळूण आणि खेडमध्ये मदतकार्यासाठी दाखल झाले. त्यांनी पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्नाने काम करण्यास सुरूवात केल्याने अनेकांची महापुरातून सुटका झाली. त्याचबरोबर चिपळुणातील व्यक्ती, संस्था, रत्नागिरीतील हेल्पिंग हॅंड्सचे कार्यकर्ते पाणी तसेच अन्य वस्तू घेऊन चिपळुणात दाखल झाले.
दहा रूग्णांचा महापुरात बळी
कमी वेळात कोसळलेल्या पावसामुळे चिपळुणातील रूग्णालयांमध्येही पाणी घुसल्याने रूग्णसेवा कोलमडली. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णांबरोबरच तिथल्या डाॅक्टर्स आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात आले. यामुळे चिपळुणातील दहा कोरोना रूग्णांना प्राण गमवावे लागले.
अन्य सातजण पुराचे बळी
जिल्ह्यात झालेल्या या ढगफुटीमुळे सातजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यात रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये - बाैद्धवाडी येथील एक महिला तर चिपळुणातील सहाजणांचा समावेश आहे.