खेडमध्ये अतिवृष्टीचे थैमान; अनेक मार्ग बंद

By admin | Published: September 23, 2016 11:21 PM2016-09-23T23:21:48+5:302016-09-23T23:21:48+5:30

चिपळुणातील पाणी ओसरले : गतवर्षीपेक्षा सरासरी ११४0 मि.मी. जादा पाऊस ; भातशेतीला मोठा फटका

Great habitat in the village; Turn Off Many Routes | खेडमध्ये अतिवृष्टीचे थैमान; अनेक मार्ग बंद

खेडमध्ये अतिवृष्टीचे थैमान; अनेक मार्ग बंद

Next

रत्नागिरी : सलग नऊ दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी रात्री जिल्ह्याला चांगलाच दणका दिला. शुक्रवारीही दिवसभर मुसळधार पडलेल्या पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खेड तालुका तसेच चिपळूण शहराला बसला आहे. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. अनेक गावांकडे जाणारे मार्ग बंद झाले आहेत.
खेडमधील जगबुडी पुलावरून पुराचे पाणी गेल्याने गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून ठप्प झालेली रस्ते वाहतूक शुक्रवारी अंशत: सुरू झाली. चिपळूण शहरातील पाणी शुक्रवारी ओसरले. दिवाणखवटी ते खेड स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर रात्री ११ वाजता पाणी भरल्याने सुमारे ३ तास कोकण रेल्वे वाहतूकही ठप्प झाली. या अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
लांजा, राजापूर वगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून, शुक्रवारी दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले. सर्वाधिक भयावह स्थिती खेड तालुक्यात असून, मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी पुलावरून रात्री काही तास पाणी वाहत होते. त्यामध्ये पुलाचे रेलिंग वाहून गेल्याने हा पूल अधिकच धोकादायक बनला आहे. ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या या पुलावरून गेल्या दहा वर्षांत प्रथमच पाणी वाहून गेल्याने महामार्गावरील वाहतूक गुरुवारी रात्रीपासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही दिशांनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सकाळी महामार्गावरील वाहतूक अंशत: सुरू झाली. सावधपणे एक-एक वाहन पुलावरून पाठवण्यात येत आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूक मंदगतीने सुरू आहे. चिपळूण शहरात गुरुवारी रात्री पाणी भरल्याने धोक्याचा इशारा देण्यात आला होता. प्रशासनही संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी तयार होते. मात्र, शुक्रवारी हे पाणी ओसरल्याने तूर्तास धोका दूर झाला आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने सतर्कता बाळगली जात आहे. गेल्या २४ तासात खेड तालुक्यात सुमारे १0 इंच पावसाची नोंद झाली आहे. अनंत चतुर्दशीच्या आधीच्या दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पावसाने सुरुवात केली आहे. सलग नऊ दिवस जिल्ह्यात पावसाचा मुक्काम आहे. गुरुवारी दुपारपासून या पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी खेड तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. तालुकावार पावसाचे प्रमाण मिलिमीटरमध्ये याप्रमाणे : खेड-२९७, मंडणगड-१६0, चिपळूण-१३0, दापोली-१२९. खेड, चिपळूण वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी संततधार कायम आहे.
मुसळधार पावसामुळे गुरुवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावरील खेड भरणे नाका येथील जगबुडी नदी पुलावरून पाणी वाहू लागल्याचे वृत्त जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचले आणि आवश्यक उपाययोजनांची तयारी तत्काळ सुरू झाली. महाडमधील पुलाच्या दुर्घटनेमुळे आधीच महामार्गावरील जुन्या पुलांचा विषय ऐरणीवर आल्याने प्रशासनाकडून तातडीने हालचाली झाल्या. दुर्घटना होऊ नये यासाठी रात्री १0 वाजल्यापासून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. शुक्रवारी दुपारपासून ही वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू करण्यात आली. मात्र, एकावेळी एकच वाहन सोडले जात होते.
महापुरामुळे जगबुडी नदीवरील पुलाचे कठडे जागोजागी तुटले आहेत. जे शिल्लक आहेत त्यात झुडपे आणि कचरा मोठ्या प्रमाणात अडकून राहिला आहे. पुलावरील रस्ता खराब झाला आहे. दरम्यान, खेड तालुक्यातील बिजघर येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध अजूनही लागलेला नाही. त्याचे नाव सुधाकर दत्ताराम भोसले (वय ४९) असे असल्याची माहिती आज पुढे आली आहे. खेड बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
चिपळूण शहरात गुरुवारी रात्री पुराचे पाणी शिरले. मात्र, पावसाचा जोर ओसरल्यामुळे पहाटेपर्यंत पाणी ओसरले. चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट, मंडणगडमधील केळवत घाट आणि खेडमधील वेरूळ खोपी घाटात कोसळलेली दरड मार्गावरून हटवण्यात आल्याने बंद झालेली वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे २३ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी १० वाजता प्राप्त झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार मंडणगड तालुक्यात मौजे केळवत घाट येथे रात्री ११.00 वाजता दरड कोसळली होती. रात्री ३.00 वाजता दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. खेड तालुका बाजारपेठ येथे पुराचे पाणी शिरले होते. मात्र, आता स्थिती नियंत्रणात आहे. मौजे बिजघर फरशी पुलावरून सुधाकर दत्ताराम भोसले हे पुराच्या पाण्यातून वाहून गेले. वेरुळ -खोपी-वेळवंडी मार्गावरील कोसळलेली दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. रघुवीर घाट येथे दरड कोसळलेली असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरड हटवण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे वाहतुकीला तीन तास ब्रेक
महामार्गाप्रमाणेच कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी ते खेड दरम्यान ट्रॅकवर पाणी भरल्याने तीन तास रेल्वे वाहतूकही थांबविली. याचवेळी मुंबईहून रत्नागिरीकडे येणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेगाडी खेडकडे येत होती. मात्र, पाणी भरल्याने ही गाडी मागील स्थानकावर नेण्यात आली. पाणी ओसरल्यानंतर ही गाडी रत्नागिरीकडे पाठविण्यात आली. या दरम्यान गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

Web Title: Great habitat in the village; Turn Off Many Routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.