हा तर सागरी महा‘खड्डे’मार्ग!
By admin | Published: November 16, 2016 10:36 PM2016-11-16T22:36:32+5:302016-11-16T22:36:32+5:30
सागरी मार्गाची दुर्दशा : गणपतीपुळेकडे जाताना होतोय जिवाशी खेळ
रत्नागिरी : आरे - वारेमार्गे गणपतीपुळेला जाणाऱ्या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टिने ‘शॉर्टकट’ असलेला हा मार्ग पर्यटकांना सध्या ‘लाँग कट’ भासू लागला आहे. त्यामुळे पर्यटन विकासाच्या केवळ घोषणाच केल्या जात आहेत की काय, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. पावसाळ्यानंतर या मार्गावर काही ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, आता त्याच्या दुप्पट खड्डे पडल्याने वाहनचालक अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहात आहेत.
पर्यटकांना समुद्राचे दर्शन घेत प्रवास करता यावा, यासाठी निर्माण केलेल्या सागरी महामार्गाला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. गणपतीपुळे धार्मिक क्षेत्राबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही आज जगाच्या नकाशावर प्रसिद्ध पावलेले आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरवर्षी लाखापेक्षा जास्त पर्यटक या ठिकाणी येतात. या मार्गावरील आरे-वारे बीच तसेच इतर स्थळेही पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. तसेच ठराविक अंतरावर नावांचे दिशादर्शक फलक नसल्याने रात्री - अपरात्री या रस्त्यावरून वर्दळ सुरू असतानाही गणपतीपुळे कुठे आहे, अशी विचारणा पर्यटकांना जागोजागी करावी लागते. रस्त्यालगत झाडीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या गोष्टींमुळे पर्यटकांना या मार्गावरून ये-जा करणे त्रासदायक होत आहे. जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे मार्गाच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासनाचेही दुर्लक्ष झालेले आहे.
पर्यटकांनी जिल्ह्यात यावे, यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. दरवर्षीच पर्यटन महोत्सवावर प्रशासन
रत्नागिरी ते आरेवारे हे २२ किमी अंतर आहे. यादरम्यान शिरगाव दत्तमंदिर, शिरगाव मोहल्ला, कासारवेली मयेकर घर ते लक्ष्मीकेशव थांबा, काळबादेवी रेशन दुकान, बसणी पोखरबाव ते आरे वारे कॉर्नर, आरे सुरुबन, आरे वारे पूल ते गजानन मयेकर यांचे घर, नेवरे काजिरभाटी ते भंडारपुळे यादरम्यान मोठे खड्डे पडले आहेत.
करोडो रूपये खर्च करते. मात्र, गणपतीपुळेसारख्या क्षेत्राच्या विकासाबाबत उदासीनता दाखवून दुर्लक्ष करीत असल्याबद्दल पर्यटकांकडूनच नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरीनजीकच्या शिरगाव येथूनच खड्डेमय रस्ता सुरु होतो. शिरगावमधील रेशन दुकान याठिकाणी तर एवढे खड्डे पडले आहेत की, तेथून चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचाही तोल ढळू शकतो. शिरगाव दत्तमंदिर, बसणी या भागातही रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्याबाबत लोकप्रतिनिधींना कोणतेही सोयरसुतक नाही.
शिरगाव रेशन दुकानापासून गणपतीपुळेकडे जाणाऱ्या रस्त्याची सात-आठ महिन्यांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. खडी आणि डांबर टाकून खड्डे बुजावण्यात आले. मात्र, त्याठिकाणी पूर्वीपेक्षा जास्त खड्डे आता पडले आहेत. लोकप्रतिनिधी आणि संबंधित खात्याच्या नावे लोक शिव्यांच्या लाखोली वाहात आहेत.
रस्ता अरुंद असल्याने शिरगाव येथे वारंवार वाहतूककोंडी होते. त्यातच रस्त्यावर खड्डे असल्याने वाहतूक संथगतीने सुरू असते. रत्नागिरीहून गणपतीपुळेकडे जाण्यासाठी हा सर्वांत जवळचा मार्ग आहे. शहरात आलेला पर्यटक गणपतीपुळेकडे जाताना नाक मुरडतो, त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत आहे.