धोपावे, वेलदूर, साखरीत्रिशुळ गावांना मोठा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:29 AM2021-05-22T04:29:25+5:302021-05-22T04:29:25+5:30
असगोली : जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या सूचनेनंतर तालुक्यातील धोपावे, वेलदूर, साखरीत्रिशुळ या गावांना आरजीपीपीएल कंपनीमार्फत ...
असगोली : जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या सूचनेनंतर तालुक्यातील धोपावे, वेलदूर, साखरीत्रिशुळ या गावांना आरजीपीपीएल कंपनीमार्फत पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमधील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
विक्रांत जाधव हे गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील पाणी टंचाईबाबत पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक झाली होती. गुहागर तालुक्यासाठी शासकीय टँकर नसल्याने धोपावे, वेलदूर, साखरीत्रिशुळ, आदी गावांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याची बाब समोर आली. दरवर्षी आरजीपीपीएल कंपनीकडून वेलदूर व अन्य गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, यावर्षी तो सुरू करण्यात आला नाही, अशी माहिती बैठकीत समोर आली. याची दखल घेऊन जाधव यांनी कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला आणि ताबडतोब टँकर उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यानुसार हा टँकर सुरू करण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यासाठी शासकीय टँकर नसल्याने खासगी टँकर उपलब्ध करून घ्यावा, अशी सूचना विक्रांत जाधव तसेच मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनीही प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना केली होती. त्यावरही कार्यवाही करण्यात आली असून, खासगी टँकर घेण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी गुहागर पंचायत समितीच्या दिले आहेत. तसे पत्रही पंचायत समितीला प्राप्त झाले आहे.
पाणीटंचाईच्या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून टँकर उपलब्ध करून दिल्याबद्दल टंचाईग्रस्त गावांमधील जनतेने विक्रांत जाधव यांचे आभार मानले आहेत.