आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:08+5:302021-06-09T04:40:08+5:30
सोलकर, चिले यांची निवड रत्नागिरी : तालुक्यातील शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या काॅलेज ऑफ काॅम्प्युटर ॲप्लिकेशन फाॅर ...
सोलकर, चिले यांची निवड
रत्नागिरी : तालुक्यातील शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या काॅलेज ऑफ काॅम्प्युटर ॲप्लिकेशन फाॅर वूमेनच्या (बीसीए), टीवाय बीएस्सीच्या विद्यार्थिनींसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूव्हचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन व मुलाखतीमध्ये आजिया सोलकर व प्राजक्ता चिले या विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
योगेश पाटील यांना पुरस्कार
दापोली : येथील कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील आचार्य पदवीधर विद्यार्थी योगेश नाना पाटील यांना कृषी शिक्षण व विस्तार या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल कृषीवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता.
धान्य वाटप
राजापूर : हितवर्धक गुरव समाज मुंबई संस्थेतर्फे कोरोना महामारीमुळे समाजबांधवांसाठी वैद्यकीय आर्थिक मदत, गरजू समाजबांधवांना धान्य वाटप करण्यात आले. तांदूळ, गहू, साखर, चणाडाळ, तेल, मिठाचे कीट वितरित करण्यात आले.
शिवराज्याभिषेक दिन साजरा
गुहागर :तालुक्यातील निर्मल ग्रुप ग्रामपंचायत आवरे-असोरे येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. सरपंच मधुरा निमकर यांच्या हस्ते गुढी उभारण्यात येऊन छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामसेवक आदिती पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनाविषयी माहिती दिली.
रस्त्याच्या कामामुळे अडथळे
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील चाैपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. भरणे परिसरात सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीमध्ये अडचण येत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यासाठी मानवाधिकार आंतरराष्ट्रीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित कदम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना निवेदन दिले आहे.
विजेचा खांब कोसळला
दापोली : येथील बसस्थानकासमोरील राणी काॅम्प्लेक्स आवारात झाड तोडत असताना विजेचा सिमेंटचा खांब इमारतीवर पडला; मात्र वीजवाहिनी बंद असल्याने तसेच परिसरात कुणीही व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मास्कचे वाटप
दापोली : शहरात लाॅकडाऊन काळात अविरत सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच होमगार्ड जवानांना दापोली अर्बन बँकेतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले. पोलिसांतर्फे बँकेचे आभार मानण्यात आले.
अतिवृष्टीचा धसका
रत्नागिरी : हवामान खात्याने दि.१० व ११ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या ताैक्ते वादळाचा फटका जिल्ह्याला बसला आहे. त्यातच आता अतिवृष्टी होणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूर्यग्रहण १० जूनला
रत्नागिरी : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण दि. १० जून रोजी वैशाख अमावस्येला होणार आहे;मात्र भारतातील काही भागात आंशिक स्वरूपात दिसणार आहे. गुरुवार दि. १़ ४२ वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होणार आहे.