म्युकरमायकोसिसचा कोकणाला धोका अधिक, काळजी घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:31 AM2021-05-16T04:31:19+5:302021-05-16T04:31:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणातील हवामानात आर्द्रता अधिक असल्याने म्युकरमायकोसिस अर्थातच काळ्या बुरशीच्या आजाराची शक्यता अधिक आहे. त्यात ...

The greater the risk of mucomycosis in Konkan, the need for care | म्युकरमायकोसिसचा कोकणाला धोका अधिक, काळजी घेण्याची गरज

म्युकरमायकोसिसचा कोकणाला धोका अधिक, काळजी घेण्याची गरज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणातील हवामानात आर्द्रता अधिक असल्याने म्युकरमायकोसिस अर्थातच काळ्या बुरशीच्या आजाराची शक्यता अधिक आहे. त्यात आता पावसाळा जवळ येत आहे. या काळात आर्द्रता अधिकच वाढते. त्यामुळे हा आजार अधिक बळावतो. त्यामुळे कोकणातील लोकांनी विशेषत: ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. श्वसननलिकेप्रमाणेच डोळ्यांवरही त्याचा परिणाम होत असल्याने त्याबाबत सजग राहण्याची वेळ आली आहे.

काळी बुरशी हवेतच असते. जखम किंवा श्वसनाद्वारे ती आपल्या शरीरात जाते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे, अशा लोकांना त्याचा त्रास होत नाही. त्या बुरशीवर मात होते; पण ज्यांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा लोकांना मात्र त्याचा त्रास सुरू होतो. त्यासाठी शरीराकडे, त्यात होणाऱ्या बदलांकडे, आजारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत इन्फिगो आय केअरच्या डॉ. श्रीधर ठाकूर यांनी व्यक्त केले. कोकणातील हवामानात मुळातच आर्द्रता आहे. त्यामुळे या भागात काळ्या बुरशीचे आजार आधीपासूनच आहेत; पण आतापर्यंत त्याबाबतची तीव्रता, त्याच्या परिणामांची तीव्रता पुढे आली नव्हती; पण आता कोरोनाकाळात ही तीव्रता स्पष्टपणे पुढे आली आहे. त्यातच आता पावसाळा येत आहे. या काळात काळी बुरशी वाढते. त्यामुळे त्याबाबत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे डॉ. ठाकूर, डॉ. किरण हिरजे आणि डॉ. नितीन भगत यांनी सांगितले.

आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात असा रुग्ण असल्याचे समोर आलेले नाही. मात्र, आता कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आर्द्रता अधिक असल्याने या आजाराची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे रत्नागिरीत अजून रुग्ण आढळला नसला तरी ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

...................

म्युकरमायकोसिसची लक्षणे

श्वसनातून किंवा जखमेतून शरीरात प्रवेश करणाऱ्या बुरशीमुळे टाळू, श्वसननलिका मार्गावर काळे डाग पडू लागतात.

नाकातून रक्त येते, काळसर पाणी वाहू लागले.

बुरशी डोळ्यांपर्यंत पोहोचल्यास डोळे येतात. (लाल होतात)

डोळ्यातून सतत पाणी येते. पापण्या सुजतात.

..............................

रुग्णावरचे परिणाम

काळ्या बुरशीचा ॲटॅक ज्या भागावर झाला आहे, त्या भागावर खूप मोठे परिणाम होतात. बुरशीचा प्रभाव झाला आहे, अशा अवयवाचे नुकसान होते. त्या अवयवांची काम करण्याची प्रक्रिया कमी होते.

डोळ्यांना त्याची बाधा झाल्यास सर्वात प्रथम अंधूक दिसू लागते. वेळेवर इलाज न झाल्यास बुरशी पसरली (वाढली) की दुहेरी प्रतिमा दिसू लागतात. तिरळेपणा येतो. त्याही पुढच्या टप्प्यात अंधत्व येते किंवा डोळा काढून टाकावा लागतो.

............................

कोणाला होऊ शकतो हा आजार

ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांना हा आजार होतो.

तीव्र मधुमेही, ज्यांची किडनी बदलण्यात आली आहे, अशांना त्याचा त्रास लवकर होतो.

आता कोविडकाळात याचे प्रमाण काहीसे वाढलेले दिसते. कोविडपश्चात म्युकरमायकोसिसचा त्रास होण्याची शक्यता अधिक बळावते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशांना कोविडचा त्रास होतो. कोविडच्या औषधांमधून स्टेरॉइडचा मारा होतो. त्याने फुप्फुसाची काम करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे अशा लोकांना काळ्या बुरशीच्या आजाराचा त्रास होऊ शकतो, असे डॉ. हिरजे यांनी सांगितले.

...............................

वर्गीकरण करायला हवे

उन्हाळ्याच्या दिवसात डोळ्यांच्या साथी येतात. डोळे लाल होणे, डाेळ्यांना खाज येणे, डोळे येणे अशा साथी या दिवसात असतात. ही लक्षणे आणि म्युकरमायकोसिसची लक्षणे यात काय फरक आहे, हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. हे त्रास झाल्यावर लाेकांना म्युकरमायकोसिसची भीती वाटू लागली आहे. म्युकरमायकोसिसमध्ये डोळ्यांना खाज येत नाही. काळे डाग दिसतात. त्यादृष्टीने वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, असे डॉ. नितीन भगत यांनी सांगितले.

Web Title: The greater the risk of mucomycosis in Konkan, the need for care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.