रत्नागिरीत महिला सन्मान योजनेंतर्गत शहरी बस वाहतुकीला हिरवा झेंडा
By मेहरून नाकाडे | Published: July 6, 2024 05:24 PM2024-07-06T17:24:15+5:302024-07-06T17:25:02+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शहरी वाहतुकीत महिला सन्मान योजना सवलतीचा शुभारंभ व प्रवास करणाऱ्या महिलांचा सन्मान राज्याचे ...
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शहरी वाहतुकीत महिला सन्मान योजना सवलतीचा शुभारंभ व प्रवास करणाऱ्या महिलांचा सन्मान राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे करण्यात आला. उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शहरी वाहतूक बसला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही बस रवाना झाली.
महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना शहरी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार दि. २३ जूनपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती. मात्र, आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. शहरी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसह शालेय विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देऊन उद्योगमंत्री सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.
शहरी बससेवेतील महिला सन्मान व अन्य सवलत योजनेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उद्योजक किरण सामंत, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, आगारातील अन्य अधिकारी उपस्थित होते.