वाढत्या कोरोना चाचण्या संसर्ग रोखण्यासाठी फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:40+5:302021-06-09T04:38:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे रुग्ण लवकर लक्षात येऊ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे रुग्ण लवकर लक्षात येऊ लागले आहेत. कोरोना रुग्ण जितक्या लवकर लक्षात येतील, तेवढ्या लवकर त्यांच्यावर उपचार होऊ शकतील आणि संसर्गाचे प्रमाण कमी होईल. एका बाजूला लॉकडाऊन आणि दुसऱ्या बाजूला वाढलेल्या चाचण्या यामुळे पुढील दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा अजूनही त्यात नाही. त्यामुळे रत्नागिरी अनलॉक होणार कधी, असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे. सध्या रत्नागिरीतील रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. त्याबाबतही लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. लॉकडाऊन करूनही त्या काळात रुग्ण वाढतात कसे, असा प्रश्नही लोकांच्या मनात कायम आहे. मात्र, प्रशासनाने घेतलेले निर्णय गरजेचे असल्याचे पुढील दोन आठवड्यांत दिसेल, असे अपेक्षित आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवसाला सरासरी २१०० कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. २५ ते ३१ मे या सात दिवसांत १४ हजार ५५७ चाचण्या झाल्या. जून महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत हेच प्रमाण वाढवण्यात आले आणि त्यामुळे या सात दिवसांत ३१०० च्या सरासरीने २१ हजार ७०६ चाचण्या झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात रुग्ण झपाट्याने वाढत होते. त्यामुळे गावपातळीवरील चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत आणि या चाचण्या वाढल्यानेच लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्या वाढतीच दिसत आहे. कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत. असे रुग्ण विषाणूवाहक म्हणून घातक ठरतात. तपासणी केल्याखेरीज ते रुग्ण आहेत, हे लक्षात येत नाहीत. त्यामुळे या तपासण्या फायदेशीर होत आहेत.
चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे रुग्ण लवकर निदर्शनास आले आणि त्यांच्यावर उपचारही वेळेत सुरू झाले आहेत. त्याचवेळी लॉकडाऊन असल्यानेही संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. वाढलेल्या चाचण्या आणि लॉकडाऊन या दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील दोन आठवड्यात रुग्णसंख्या कमी झालेली दिसेल, असा अंदाज आहे.
............................
रुग्ण लवकर सापडावेत, यासाठी जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. रुग्ण वेळेत निष्पन्न झाले तर त्यांच्यावर लवकर उपचार होऊ शकतील. त्याचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी चांगला उपयोग होईल.
-लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी