लसीकरण केंद्रांवर वाढती गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:33 AM2021-04-22T04:33:10+5:302021-04-22T04:33:10+5:30
गुहागर : तालुक्यात लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे लसीकरण होत आहे. कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येमुळे आता भीतीपोटी लस घेणाऱ्यांची संख्याही ...
गुहागर : तालुक्यात लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे लसीकरण होत आहे. कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येमुळे आता भीतीपोटी लस घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशा स्थितीत लसीकरण केंद्रावर वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी कसलीच यंत्रणा नसल्याने लसीकरण केंद्रावर वादाचे प्रसंग दररोज घडत आहेत.
तालुक्यात तळवली, कोळवली, हेदवी, आबलोली, चिखली ही पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, वेळंब उपकेंद्र व गुहागर ग्रामीण रुग्णालय अशी सात केंद्रे आहेत. गुहागर ग्रामीण रुग्णालयाच्या नुरा इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेले केंद्र येथे येणाऱ्या कोविड रुग्ण लक्षात घेऊन लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही बाधा येऊ नये म्हणून शहरातील जीवन शिक्षण शाळा येथे आठवडाभरापूर्वी केंद्र सुरू केले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिवसेंदिवस लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होताना दिसत आहे. दररोज सरासरी १०० हून अधिक जणांना लस दिली जाते. आपला नंबर त्यामध्ये लागावा यासाठी काही नागरिक सकाळी ६ वाजल्यापासूनच केंद्राबाहेर नंबर लावण्यासाठी येतात. गर्दी होत असताना लावण्यात आलेल्या नंबरवरून अनेकवेळा नागरिकांमध्ये वाद होत आहेत. अशा स्थितीत येथे नगर पंचायतीने कर्मचारी ठेवून येणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे.