वाढते रुग्ण आणि काेरोनाचे बळी यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:01+5:302021-04-18T04:31:01+5:30
जिल्ह्यात शिमगोत्सवासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या भरमसाट वाढली आहे. १ ते १५ मार्च या कालावधीत ...
जिल्ह्यात शिमगोत्सवासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या भरमसाट वाढली आहे. १ ते १५ मार्च या कालावधीत २८७ असलेली संख्या १६ ते ३१ मार्च या कालावधीत ७८८ वर पोहोचली. १५ दिवसांत ५२१ नव्या रुग्णांची भर पडली, तर १ ते १६ एप्रिल या कालावधीत नव्या रुग्णसंख्येने साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. १८ मार्च २०२० ते १६ एप्रिल २०२१ या कालावधीतील एकूण रुग्णसंख्या आता १४,५६० वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत ४२९ जणांचा मृत्यू झाला आहे.
काही रुग्णांमध्ये लक्षणे आढळली तरीही आपण पाॅझिटिव्ह होऊ या भीतीने नागरिक चाचणी करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे उपचार वेळेवर होत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. रुग्ण शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. परिणामी मृत्यूची टक्केवारीही वाढू लागली आहे. रत्नागिरी आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मंडणगड तालुक्यात सर्वांत कमी मृत्युदर आहे.
मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाकडून वेळेवर उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचेही आवाहन केले जात आहे. रुग्णसंख्या वाढण्यासाठी नागरिकांची बेफिकिरी हे महत्त्वाचे कारण आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा जीव तोडून रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या मृत्यूची टक्केवारी २.९४ इतकी आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढू लागल्याने आता बरे होणाऱ्यांची संख्या ७९ टक्क्यांवर आली आहे.
चाैकट
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या (तालुकानिहाय १६ एप्रिल अखेर)
रत्नागिरी ११३
खेड ६१
गुहागर १५
दापोली ४९
चिपळूण ९९
संगमेश्वर ४८
लांजा १७
राजापूर २१
मंडणगड ६
एकूण ४२९