रुग्णवाढीचा दर कमी होतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:43+5:302021-07-22T04:20:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राजापूर : गतवर्षी कोरोना संसर्गापासून दूर असणारा राजापूर तालुका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र रुग्णसंख्येत गतिमान ...

The growth rate is declining | रुग्णवाढीचा दर कमी होतोय

रुग्णवाढीचा दर कमी होतोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : गतवर्षी कोरोना संसर्गापासून दूर असणारा राजापूर तालुका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र रुग्णसंख्येत गतिमान राहिला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यातील रुग्णसंख्या बऱ्याच प्रमाणात मंदावली असून, रुग्णसंख्या वाढीचा दर घटला आहे.

गतवर्षी कोरोना संक्रमणाबाबत राजापूर शहर आणि संपूर्ण तालुका कायम ‘सेफ झोन’ म्हणून ओळखला जात होता. तालुक्यातील सुमारे ९५ टक्के गावांनी कोरोनाला गावात प्रवेशच दिला नव्हता. मात्र, यावर्षी मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यात मृत्यूंचे प्रमाणही वाढले. सध्या राजापूर तालुक्यात कोरोनाचे ३३२ रुग्ण ॲक्टिव्ह असून, एकूण रुग्णसंख्या ४,५६१ एवढी झाली आहे.

राजापूर तालुक्यात आजपर्यंत सापडलेल्या ४,५६१ कोरोना रुग्णांपैकी ४,०५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील १७६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर चांगलाच आटोक्यात आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी मोठ्या प्रमाणात घेतली होती. पुणे, मुंबईसारख्या महानगरांतून येणाऱ्या चाकरमान्यांचे १४ दिवसांचे अलगीकरण करण्यात येत होते. त्यावर ग्राम कृती दल आणि आरोग्य विभागाने लक्ष ठेवले होते. त्यामुळे १४ दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही इतरांमध्ये मिसळता येत नव्हते.

यावर्षी दुसऱ्या लाटेमध्ये नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन केलेले नसल्याने त्याचा परिणाम कोरोना रुग्णसंख्या वाढण्यात झाला. शिमग्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. मार्च महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी दिसून आली. प्रशासनही अनेक नियमांकडे दुर्लक्ष करत होते. यावर्षीची लग्नसराई राजापूर तालुक्यासाठी कोरोना रुग्णसंख्येत वाढ करणारी ठरली. मुंबई, पुण्यातून येणारे चाकरमानी यावर्षी विलगीकरणात न राहता आपापल्या कुटुंबात मिसळल्याने कोरोना संक्रमण अधिक झाले. या दुसऱ्या लाटेमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले. यावेळी मृत्यूंचे प्रमाणही वाढले. त्यातच सर्व वयोगटातील लोक मृत्यूमुखी पडत असल्याने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली.

राजापूर तालुका

एकूण रुग्ण ४,५६१

कोरोनामुक्त ४,०५३

मृत्यू १७६

सक्रिय रुग्ण ३३२

गृह अलगीकरण २३२

संस्थात्मक ०

Web Title: The growth rate is declining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.