‘इंद्रधनू’त पालकमंत्री उदय सामंत यांची तरूणाईत क्रेझ; थ्रीडी रांगोळीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले
By शोभना कांबळे | Published: November 24, 2023 06:52 PM2023-11-24T18:52:12+5:302023-11-24T18:52:31+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी येथील दामले प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या ‘इंद्रधनू’ या रांगोळी प्रदर्शनात राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय ...
रत्नागिरी : रत्नागिरी येथील दामले प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या ‘इंद्रधनू’ या रांगोळी प्रदर्शनात राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची क्रेझ तरूणाईमध्ये असल्याचे दिसले. या प्रदर्शनात सामंत यांच्या रांगोळीने विशेषत: रांगोळीकार राहूल कळंबटे यांच्या टू इन वन थ्रीडी रांगोळीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
शहरातील दामले विद्यालयात दिवाळी सणाचे औचित्य साधून उदय सामंत फाउंडेशनतर्फे १४ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत इंद्रधनू हे रांगोळी प्रदर्शन रत्नागिरीत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात जिल्ह्यातील आणि राज्यातील १९ दिग्गज रांगोळीकारांनी सहभाग घेतला होता.या कलाकारांनी अप्रतिम अशा रांगोळ्यांमधून रत्नागिरीतील मेवा, दैवते, परंपरा आदींचे चित्रण हुबेहूब केले होते.
थाळीतील कोकणी खाद्यपदार्थ, दिवाळीच्या फराळाचे टेबलावर असलेले ताट, पिकलेले फणसाचे गरे, आंबे, करवंदे यांचे रांगोळीतून अप्रतिम दर्शन या कलाकारांनी घडविले. स्त्री सबलीकरण, साक्षरता आदींबाबत संदेश देतानाच स्त्री अत्याचार, कामगार दिन साजरे होत असले तरी त्यांच्या असलेल्या व्यथा आदी विविध सामाजिक समस्यांचे चित्रण विविध रांगोळीकारांनी केले होते. या रांगोळ्या पाहताना त्यातील ‘थ्रीडी इफेक्ट’मुळे त्या प्रत्यक्ष साकार झाल्यासारख्या वाटत होत्या.
अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आणि त्यांचे केसरी वृत्तपत्र, रत्नागिरीकरांचे दैवत भैरीबुवा, पंढरपूरचा विठोबा, श्री रत्नागिरीचा राजा याचबरोबर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रत्नागिरीचे सुपुत्र असलेले आणि राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची हुबेहूब छबी या रांगोळीतून साकार झाली होती. दर्शक या कलाकृती पाहून स्तंभित होत होते.
प्रदर्शनामध्ये आकर्षण म्हणून ( २ in 1) असलेली मंत्री सामंत यांची थ्री डी रांगोळीने सर्वांचेच विशेषत्र: युवांचे लक्ष आकर्षित केले. रांगोळीकार राहूल कळंबटे यांच्या हस्तकाैशल्यातून साकार झालेल्या या रांगोळीत एका बाजूने वाघाचे चित्र तर दुसऱ्या बाजूने उदय सामंत दिसत होते. तब्बल १३ तासांच्या परिश्रमाने कळंबटे यांनी ही कलाकृती साकार केली होती.दहा दिवस सुरू असलेल्या या रांगोळी प्रदर्शनात जिल्हाभरातूनच नव्हे तर बाहेरच्या सुमारे दहा हजार दर्शकांनी हजेरी लावली.