रस्ता, पाणी, हेल्मेट सक्ती, पेन्शनच्या समस्या थेट पालकमंत्र्यांच्या दरबारात; तक्रारींचे समोरासमोर निराकरण
By शोभना कांबळे | Published: June 5, 2023 05:28 PM2023-06-05T17:28:39+5:302023-06-05T17:30:33+5:30
ऑनलाईनच्या माध्यमातून इतर तालुक्यांमधीलही अधिकारी तक्रार निराकरणासाठी उपस्थित
रत्नागिरी : रस्ता, पाणी, जागेवर अतिक्रमण, रस्ता बांधकाम, वैयक्तिक लाभ, निवृत्ती पेन्शन रखडले, हेल्मेट सक्ती अशा विविध यंत्रणांविरोधात प्रकारच्या समस्या मांडण्यासाठी नागरिक सोमवारी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात पोहोचले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, रत्नागिरीचे प्रांत डाॅ. विकास सुर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर तसेच जिल्ह्याच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून इतर तालुक्यांमधीलही अधिकारी तक्रार निराकरणासाठी उपस्थित होते.
या जनता दरबारात एकूण ५३ तक्रारकर्ते उपस्थित होते. गाळ काढणे, तांडा वस्ती योजनेच्या निधीचा दुरूपयोग, रस्ता, पाणी, अनधिकृत बांधकाम, तसेच वैयक्तिक लाभाच्या तक्रारी यावेळी मंत्री सामंत यांच्यासमोर मांडण्यात आल्या. या तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून समोरासमोर निराकरण केले जात होते.