देशभरातील शहीद पोलिसांना अभिवादन, स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र वाहून पालकमंत्री सामंत यांच्याकडून श्रद्धांजली
By मनोज मुळ्ये | Published: October 21, 2023 03:29 PM2023-10-21T15:29:12+5:302023-10-21T15:30:51+5:30
रत्नागिरी : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पालकमंत्री उदय सामंत यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र वाहून ...
रत्नागिरी : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पालकमंत्री उदय सामंत यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून पोलिस दलाकडून शहिदांना सलामी देण्यात आली.
गेल्या वर्षभरात पोलिस दलातील ज्या पोलीस अधिकाऱ्यांना व अंमलदारांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यांच्या स्मृतीस येथील पोलिस कवायत मैदानावरील स्मृतिस्तंभास पालकमंत्री सामंत, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकणी आणि पोलिस उपअधीक्षक नीलेश माईनकर यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
पालकमंत्री सामंत यांनी यावेळी श्रद्धांजली संदेश वाचन केले. लडाख येथे केंद्रीय राखीव पोलिस दलातील १० शूर शिपायांवर २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व प्रतिकार करण्याचा प्रयत्न करुन सरहद्दीचे संरक्षण करताना प्राण गमावला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस प्रतिवर्षी देशभरात पोलिस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. दि. १ सप्टेंबर २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत भारतामध्ये एकूण १८८ पोलिस अधिकारी व जवान यांनी कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करले.
वर्षभरात अशाप्रकारे वीरगती प्राप्त झालेल्या देशातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या आत्म्यास शांती लाभो, म्हणून त्यांना भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करतो, असे सामंत यांनी सांगितले. यानंतर पोलिस दलामार्फत हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहिदांना सलामी देण्यात आली.