कोरोनामुळे शांततेची गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:29 AM2021-04-14T04:29:00+5:302021-04-14T04:29:00+5:30
रत्नागिरी : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा, सभा, श्री सत्यनारायण महापूजा यासारखे विविध कार्यक्रम ...
रत्नागिरी : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा, सभा, श्री सत्यनारायण महापूजा यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र कोरोनामुळे शासकीय निर्बंध कडक असल्याने यावर्षी गुढीपाडवा कार्यक्रमांविना शांततेतच साजरा करण्यात आला. नववर्षाच्या शुभेच्छा देताना, आरोग्याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना देण्यात येत होत्या.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्ताने आवर्जून खरेदी करण्यात येते. सोन्या-चांदीचे अलंकार, वस्त्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, तयार घरे, जमिनींची खरेदी करण्यात येते. किंबहुना आधी खरेदी केलेल्या वस्तू पाडव्यादिवशी घरी आणल्या जातात. मात्र कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य व्यवसाय संमिश्र स्वरूपात सुरू आहेत. फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने, गृहसंकुल प्रकल्प व्यावसायिकांकडून ग्राहकांसाठी पाडव्यानिमित्त आकर्षक भेट योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र बाजारपेठच शांत असल्याने या व्यवसायांवरही त्याचा परिणाम झाला आहे.
कडुनिंबाचा पाला, झेंडूच्या फुलांची माळ तसेच साखरगाठीची माळ लावून सुशोभित गुढी सर्वत्र उभारण्यात आली होती. प्रत्येकाच्या दारासमोर सुबक रांगोळी काढून उभारण्यात आलेल्या गुढीचे पूजन करण्यात आले. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांना उंच गुढी उभी करणे अशक्य असल्यामुळे रेडीमेड/तयार गुढी उभारण्यात आली होती. भाविकांनी गुढी उभारताना कोरोनारूपी जागतिक संकट निवारणाची प्रार्थना केली.
दरवर्षी उत्साहाने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने स्वागत यात्रेमध्ये खंड पडला आहे. कोरोनामुळे सण शांततेत साजरा करण्यात आला. पाडव्याच्या सणानिमित्त प्रत्यक्ष न भेटता फोनवरूनच नववर्षाच्या आरोग्यमय शुभेच्छा देण्यात आल्या.