गुहागर अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे दिव्यांगांना फळवृक्ष वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:42+5:302021-07-27T04:32:42+5:30
असगोली : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे जागतिक वृक्षारोपण पंधरवड्याचे औचित्य साधून तालुक्यातील ...
असगोली : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे जागतिक वृक्षारोपण पंधरवड्याचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सुपारी (पोफळ) या फळ वृक्षाचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले. दिव्यांगांना त्यांच्या घराच्या परिसरात तसेच इतर मोकळ्या जागेत वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडे लावून त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनविण्याच्या उद्देशाने दरवर्षी वृक्षारोपण दिनाचे औचित्य साधून फळझाडांचे वाटप करण्यात येते. बऱ्याच दिव्यांगांना यापूर्वी दिलेल्या वृक्षांना फळे आलेली आहेत. प्रत्येकाने दरवर्षी एक तरी झाड लावून ते जगविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन यावेळी केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर कांबळे, संतोष रांजाणे, संस्थेचे सरचिटणीस सुनील रांजणे, सुनील मुकनाक आदी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी ५५ दिव्यांगांना उपस्थितांच्या हस्ते वृक्षांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून दिव्यांगांचे झालेले नीता पालशेतकर, सुबोध सुनील पाडावे यांच्या विवाहानिमित्त गृहपयोगी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष उदय रावणंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश अनगुडे यांनी केले. तर आभार सुनील मुकनाक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक प्रवीण मोहिते, अनिल जोशी, शेखर विचारे, संतोष घुमे, नीता पालशेतकर, उल्हास विचारे व दीपक साळवी यांनी सहकार्य केले.