गुहागर नगरपंचायतीच्या वेबसाईटचा खर्च मुख्याधिकाऱ्यांवर
By Admin | Published: April 1, 2017 12:36 PM2017-04-01T12:36:09+5:302017-04-01T12:36:09+5:30
माजी नगरसेवक मयुरेश कचरेकर यांचा आरोप
आॅनलाईन लोकमत
गुहागर दि. १ : गुहागर नगरपंचायतीच्या वेबसाईटचे काम पूर्ण होण्याअगोदरच २ लाख ८७ हजार रुपये खर्ची टाकल्याने मुख्याधिकारी यांच्याकडे आपण खुलासा मागितला असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. मात्र, वेबसाईट खर्चातील भ्रष्टाचारप्रकरण मुख्याधिकाऱ्यांवर ढकलून यातून स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न नगराध्यक्षांनी केल्याचा आरोप माजी नगरसेवक मयुरेश कचरेकर यांनी केला. वेबसाईट प्रकरणात भ्रष्टाचार झाला, हे आता सर्वांना माहीत आहे. मात्र, त्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलून जनतेची दिशाभूल केली जात आहे.
गुहागर नगरपंचायतीची वेबसाईट बनवण्यासाठी अंदाजपत्रक बनवले नव्हते. तसेच वेबसाईटचे काम पूर्ण होण्याअगोदर तब्बल २ लाख ८७ हजारांचे देयक पुण्यातील अॅबेल इलेक्ट्रोसॉफ्ट प्रा. लि. या कंपनीला देऊन यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कचरेकर यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या पत्राद्वारे केला होता. आपण दिलेल्या पत्राचे मला दिलेले उत्तर दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वेबसाईटच्या खर्चाला सर्वसाधारण सभेत मंजुरी घेणे आवश्यक होते. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून पारदर्शक कारभार करणे गरजेचे होते. असे असताना त्या वेबसाईटमधून आपल्याला काय मिळणार आहे, त्याचे नक्की स्वरुप कसे आहे, त्यासाठी येणारा खर्च किती, याचे कोणतेही अंदाजपत्रक बनवले गेले नाही. त्यासाठी कोणतेही नियोजन गुहागर नगरपंचायतीने केले नाही. आजही वेबसाईट दिसत नाही. त्यामुळे आपण केलेल्या भ्रष्टाचाराला बगल देण्याचे काम केले गेले आहे, असे मयुरेश कचरेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)