निकृष्ट पोषण आहारावरून गुहागर पंचायत समिती सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:27 AM2021-04-03T04:27:56+5:302021-04-03T04:27:56+5:30

असगोली : गुहागर तालुक्यातील अंगणवाड्या व शाळांना पुरविण्यात येणाऱ्या निकृष्ट पोषण आहारावरून पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी चांगलाच ...

Guhagar Panchayat Samiti member aggressive on poor nutrition | निकृष्ट पोषण आहारावरून गुहागर पंचायत समिती सदस्य आक्रमक

निकृष्ट पोषण आहारावरून गुहागर पंचायत समिती सदस्य आक्रमक

Next

असगोली : गुहागर तालुक्यातील अंगणवाड्या व शाळांना पुरविण्यात येणाऱ्या निकृष्ट पोषण आहारावरून पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी चांगलाच गदारोळ केला. जोपर्यंत चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळत नाही, तोपर्यंत निकृष्ट पोषण आहार न स्वीकारण्याचा ठराव करण्यात आला.

गुहागर पंचायत समितीची मासिक सभा सभापती पूर्वी निमुणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला विभावरी मुळे, पूनम पास्टे, सीताराम ठोंबरे, रवींद्र आंबेकर, स्मिता धामणस्कर, पांडुरंग कापले, गटविकास अधिकारी अमोल भोसले, सहायक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले व तालुक्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी अंगणवाडीमध्ये पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराची पाहणी केली. गेल्या मासिक सभेत या विषयावर वादळी चर्चा झाली होती. तरीही संबंधित ठेकेदाराने निकृष्ट पोषण आहार पुरविणे चालूच ठेवले आहे. सभेतूनच जिल्हा परिषदेतील जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांनी काही प्रत्युत्तर दिले नाही. यामुळे सभेत होणाऱ्या विषयावर कोणतेच निर्णय होत नसतील, तर अशा प्रकारचा निकृष्ट पोषण आहार एकाही अंगणवाडीमध्ये यापुढे स्वीकारला जाणार नाही, असा ठराव करण्यात आला.

तसेच संबंधित ठेकेदाराची गाडी सायंकाळी उशिरा अंगणवाडीमध्ये धान्य घेऊन येत असते, तसेच घाईगडबडीत पोषण आहार उतरवला जातो, पुढील अंगणवाडीमध्ये पोषण आहार द्यायचा आहे असे सांगून काही प्रमाणात कमी पोषण आहार देऊन पुढे मार्गस्थ होतो. तो गेल्यानंतर पाहणी केली असता, दिलेल्या संख्येएवढा पोषण आहार मिळत नाही. तसेच पोषण आहाराच्या पाकिटामध्ये मोठ्या प्रमाणात भुंगे असतात. परिणामी पोषण आहार स्वीकारू नये यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांची एक बैठक बोलावून त्यांना अशाप्रकारे सूचना करण्यात यावी, अशी भूमिका सदस्यांनी घेतली.

दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो, मात्र टँकरग्रस्त गावांची मागणी कायम राहते. प्रशासन सर्वच गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करू शकत नाही. खासगी टँकर चालक यांना प्रशासकीय दर परवडत नाही. यावर उपाययोजना म्हणून जल जीवन मिशन आखण्यात आले आहे. सन २०२० ते २०२१ चे प्रत्येक ग्रामपंचायतीचे आराखडे बदलून एकूण निधीच्या २५ टक्के पाण्यावर व २५ टक्के स्वच्छतेवर खर्च करण्याचे ठरले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आतापर्यंत ३४ आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे पुढील दोन ते तीन वर्षात पाणी समस्या दूर होईल, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी दिली.

चाैकट

गणिती भाषेने बाेलणार भिंती

तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांच्या संकल्पनेतून तालुक्यात ‘मिशन मॅथेमॅटिक्स’ हा नवा उपक्रम शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात येणार आहे. याची सुरुवात अंजनवेल शाळा नंबर २, अडुर शाळा नंबर १ येथे प्रायोगिक तत्त्वावर होणार आहे. तसेच तालुक्‍यातील सर्व शाळांमध्ये हा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी विविध चित्रे, विचारांनी बोलक्या झालेल्या भिंती आता गणिती भाषा बोलणार आहेत.

चाैकट

या सभेला गुहागर तालुका कृषी कार्यालयाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. सतत तीन सभांना कृषी कार्यालयाचे अधिकारी गैरहजर राहत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना पत्र काढून त्यांच्याकडून कारणे मागवण्यात यावीत, अशी सूचना सीताराम ठोंबरे यांनी केली.

Web Title: Guhagar Panchayat Samiti member aggressive on poor nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.