गुहागरात सभापती राष्ट्रवादीचाच होणार
By admin | Published: March 13, 2017 10:57 PM2017-03-13T22:57:54+5:302017-03-13T22:57:54+5:30
गुहागरात सभापती राष्ट्रवादीचाच होणार
गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या निवडणुकीत आठपैकी पाच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आल्याने सभापती राष्ट्रवादीचाच होणार हे निश्चित आहे. महिला सर्वसाधारण राखीव सभापती पदासाठी कोतळूक गणातून दुसऱ्या टर्ममध्ये निवडून आलेल्या पूनम पाष्टे या पालपेणे गणातून निवडून आल्या आहेत, तसेच यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या विभावरी मुळे यापैकी आमदार भास्कर जाधव कोणाला संधी देतात, याबाबत राजकीय गोटात उत्सुकता आहे.
पूनम पाष्टे या कोतळूक गणातून दुसऱ्या वेळी विजयी झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी तालुक्यात कुणबी फॅक्टरची जोरदार चर्चा होती. कुणबी समाज पातळीवर मोठ्या प्रमाणात चाललेल्या राजकीय हालचालीची दखल भास्कर जाधव यांनीही अंतर्गत पातळीवर घेतली होती. यापूर्वी तवसाळ गटातून जिल्हा परिषद सदस्य असणारे व कुणबी समाजप्रमुख रामचंद्र हुमणे यांना योवळी मोठा पराभव पत्करावा लागला. पंचायत समिती सदस्यांमध्ये पूनम पाष्टे व्यतिरिक्त वेळणेश्वर गणातून निवडून आलेले ठोंबरे यांचा समावेश आहे. यापूर्वी विलास वाघे, राजेश बेंडल यांना सभापती पदाची संधी मिळाली होती. बेेंडल व आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण होत आहे. पंचायत समिती निवडणुकीमध्ये राजेश बेंडल यांनी अलिप्त राहाणे पसंत केले. भास्कर जाधव यांनी सर्व स्तरातील सदस्यांना नेतृत्व द्यायचे धोरण आतापर्यंत कायम ठेवले आहे. आगामी काळाचा विचार करता मागील टर्मचा अनुभव असणाऱ्या पूनम पाष्टे यांना पहिली पसंती मिळू शकते.
भास्कर जाधव यांचे सर्वांत निकटवर्तीय असणारे विनायक मुळे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी कार्यरत आहेत. मागील टर्मममध्ये जिल्हा परिषद म्हणून त्यांच्या पत्नी विभावरी मुळे यांनी काम पाहिले आहे. पालपेणे गणातून विजयी झाल्याने मुळे या सभापती पदाच्या दावेदार आहेत. गुहागर शहरात स्नेहा वरंडे नगराध्यक्ष, तर गुहागर शहर अध्यक्ष म्हणून त्यांचे पती संतोष वरंडे काम पाहात आहेत. आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तालुक्यात घराणेशाहीची कुरबुरी चर्चेत होती. अशावेळी विभावरी मुळे यांना सभापतीपद दिल्यास याबाबतच्या चर्चेला उधाण येऊन घराणेशाहीचा संदेश जाऊ शकतो. (प्रतिनिधी)