गणेशोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:46+5:302021-09-04T04:38:46+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांसाठी तसेच उत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी विविध ...
रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांसाठी तसेच उत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार एस. टी. बस, रेल्वे तसेच खासगी वाहनांमधून जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्यांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अथवा कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा येणाऱ्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी शुक्रवारी काढलेल्या आदेशानुसार, मुंबई, पुणे किंवा जिल्ह्याबाहेरून एस. टी. बसमधून येणाऱ्या प्रवाशांची माहिती बस ज्या ठिकाणाहून सुटेल, त्याचठिकाणी दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये दोन प्रतीत भरावी लागणार आहे. ही माहिती संबंधित तालुक्याच्या एस. टी. डेपोमध्ये जमा करावी. एस. टी. विभागाला ही माहिती संबंधित तहसील कार्यालयात रोजच्या रोज जमा करावी लागणार आहे. तहसीलदारांनी ही यादी कृती दलाकडे पाठवावी. त्यामुळे येणाऱ्या लोकांची संख्या आणि नावे कृती दलाला समजू शकतील आणि त्यांच्यावर लक्ष ठेवता येणार आहे.
ग्राम/ नागरी कृती दलाने प्राप्त यादीनुसार त्यांचे गाव, वाडी-प्रभागमधील ज्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे व तपासणीकरिता अशा नागरिकांना स्थानिक आरोग्य कर्मचारी यंत्रणेमार्फत तपासणीसाठी नेण्याची जबाबदारी नागरी व ग्राम कृती दलाकडे देण्यात आली आहे. खासगी किंवा एस. टी. बस चालक-वाहकांना कोविड चाचणी अगोदरच करणे बंधनकारक असून, ती न केल्यास गाडी पोहोचण्याच्या ठिकाणावर चाचणी करावी लागणार आहे.
बाहेरून येणाऱ्यांना ७२ तास आधी कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र दाखल करावे लागणार आहे. तसेच ज्यांचे दोन डोस झाले आहेत, अशांना लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. हे दोन्ही प्रमाणपत्र नसलेल्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. कारोना चाचणीमध्ये बाधित आढळल्यास त्यांना तत्काळ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.