महामार्गावरील गुणदे गाव तीन दिवस अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:10+5:302021-06-23T04:21:10+5:30
आवाशी : बारा वाड्या, सहा जिल्हा परिषद शाळा, एक माध्यमिक विद्यालय, छोटी बाजारपेठ व सततचे रहदारीचे व गजबजलेले म्हणून ...
आवाशी : बारा वाड्या, सहा जिल्हा परिषद शाळा, एक माध्यमिक विद्यालय, छोटी बाजारपेठ व सततचे रहदारीचे व गजबजलेले म्हणून तीन हजार लोकवस्तीचे असलेले गुणदे गाव गेले तीन दिवस अंधारात आहे़ इतर समस्येसह याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसल्याने संताप व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापासून हाकेच्या अंतरावर, तर लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीजवळच असणाऱ्या गुणदे गावाला वीजपुरवठा करणारी यंत्रणा गेली तीन दिवसांपासून कोलमडली असून हे गाव गेली तीन दिवस अंधारात चाचपडत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोटे विद्युत उपकेंद्रातून वीजपुरवठा करणारी यंत्रणा पावसामुळे खांब पडल्याने आवाशी व गुणदे गावच्या सीमेवर याचा विद्युत पुरवठा खंडित झाला. शनिवारी दुपारी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असताना गेली अनेक वर्षांपासून उभे असणारे महावितरणचे विद्युत खांब जीर्ण होऊन पावसामुळे भुसभुशीत झालेल्या जमिनीतून हे खांब निखळले गेले व त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. सध्या सर्वच मुलांच्या शाळा १५ जूनपासून ऑनलाईन सुरू झाल्या आहेत. मात्र, वीजपुरवठा बंद असल्याने या गावातील सर्वच विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद झाल्याने शैक्षणिक नुकसान झाले आहे. आज दिवसभर महावितरणकडून पोल उभारण्याचे काम सुरू असून, उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला नसल्याचे समजते.