गडनदीचा श्वास कोंडला

By admin | Published: March 15, 2015 09:25 PM2015-03-15T21:25:15+5:302015-03-16T00:17:26+5:30

खडसेंना निवेदन : गाळ उपसण्याची केली मागणी

Gunnadi's breathing stops | गडनदीचा श्वास कोंडला

गडनदीचा श्वास कोंडला

Next

आरवली : पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यांमुळे संगमेश्वर तालुक्यातील गडनदी व इतर नद्यांच्या विस्तारात वाढ होते. या नद्यांमध्ये गाळ साचल्याने बहुतांश शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पुराच्या पाण्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान होत असल्याने गडनदीसह तालुक्यातील नद्यांमधील गाळ उपसा करण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी संगमेश्वर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य जाकीर शेकासन यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे.
गडनदीचा सह्याद्रीच्या खोऱ्यातून उगम झाला आहे. कुंभारखाणी, मुरडव, आरवली, कोंडिवरे, माखजन यागावातून ही नदी करजुवे येथे अरबी समुद्राला मिळते. तसेच तालुक्यातून शास्त्री, सोनवी, असावी, अलकनंदा, काजळी, सप्तलिंंगी, बावनदी या अन्य नद्याही वाहतात. गडनदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका आरवली आणि माखजन येथील बाजारपेठांना बसतो. तसेच अनेक गावांतील नदीकिनाऱ्यावरील शेती वाहून जाते. सखल भाग असल्याने पुराचे पाणी शेतीमध्ये थांबून शेती कुजण्याचेही प्रमाण मोठे असते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. २००५ आणि २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत माखजन भागात मोठ्या प्रमाणावर पुरामुळे नुकसान झाले होते. तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यावेळी गडनदीतील गाळ उपसा करण्यासाठी निधीची उपलब्धता करुन देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप निधी मिळाला नसल्याने गाळ उपशाचे काम झालेले नाही.
धामणीकडून संगमेश्वरकडे वाहणाऱ्या नदीमुळे कसब्या जवळची शेती गिळंकृत केली आहे. धामणी, आंबेड खुर्द या भागातही नदीच्या काठावरील शेतीला धोका पोहचला आहे. शास्त्री आणि सोनवीच्या संगमाच्या पुढे असणाऱ्या गावांमध्ये तर नदीच्या बदलत्या प्रवाहाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना दरवर्षी बसत आहे. या नद्यांमध्ये जमा झालेला गाळ उपसा करावा, अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे, पण याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने व वर्षानुवर्षे असाच प्रकार सुरू राहिल्याने शेतकरी जनतेत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
धामापूर आणि काही भागात गडनदीच्या भरतीचे खारे पाणी शेत जमीन क्षेत्रात घुसत असल्यामुळे शेतीचे नुकसान होते. यामुळे खार जमीन प्रतिबंधक उपाय म्हणून या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. यासाठी बंदर खात्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे शेकासन यांनी सांगितले. (वार्ताहर)


गाळात रूतल्या नद्या .....
कोकणात चिपळूण, संगमेश्वर, खेड, दापोली, राजापूर अशा तालुक्यांमध्ये शहरात पुराच्या पाण्याचा फटका बसतो व त्यामुळे आर्थिक हानी पोहोचते. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा काळात सर्वच स्तरावर आपण ठप्प असतो. हे सारे प्रकार नित्याचेच होत असल्याने व या साऱ्यावर मात करण्यासाठी पूर्वीच्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी शेकासन यांनी केली आहे.

Web Title: Gunnadi's breathing stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.