गुरूजनांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:28 AM2021-07-26T04:28:51+5:302021-07-26T04:28:51+5:30

रक्तदान शिबिराचे आयोजन रत्नागिरी : शहरातील मारूती मंदिर येथील निरामय योग संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक वीरू स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ...

Gurujan's felicitation | गुरूजनांचा सत्कार

गुरूजनांचा सत्कार

Next

रक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : शहरातील मारूती मंदिर येथील निरामय योग संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक वीरू स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत संस्था कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात संस्थेतील योग साधक सहभागी होणार आहेत.

मुदतवाढीची मागणी

रत्नागिरी : कोकणातील पाचही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पाचही जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी, चिखल साचून पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघातर्फे करण्यात आली आहे.

खिचडी वाटप

रत्नागिरी : राष्ट्रसेविका समितीतर्फे १५ जणांच्या टीमने खिचडी तयार करत त्याची पाकिटे बनवून चिपळूण येथील पूरग्रस्तांना वितरीत केली. रत्नागिरी, गोळवली येथील सेविका मदतकार्यात सहभागी झाल्या होत्या. शिवाय देवरूखातील शर्मिष्ठा शाखेतर्फे पोळ्या, चटणी, लोणचं, दूध पावडर, दूध पिशव्या, पाणी बाटल्यांचे वितरण करण्यात आले.

दरडी हटविण्याचे काम सुरू

देवरूख : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दोन ठिकाणी डोंगर खचून दरडी रस्त्यावर आल्या आहेत. गेले दोन दिवस पाऊस थांबला असून, दरडी हटविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दरडी हटवल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा होणार आहे.

विल्ये येथे कोरोना तपासणी

रत्नागिरी : तालुक्यातील विल्ये गावात घेण्यात आलेल्या कोरोना तपासणी चाचणीला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील १२८ ग्रामस्थांनी आरटीपीसीआर तपासणी करून घेतली. हे तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच माधवी कांबळे, उपसरपंच नरेश कांबळे, पोलीस पाटील रमेश कांबळे, ग्रामसेवक सोनकांबळे, तलाठी सुखदा शिरकर यांचे सहकार्य लाभले.

माजी शिक्षकांचा स्नेहमेळावा

दापोली : शहरातील ए. जी. हायस्कूलच्या माजी शिक्षकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डाॅ. प्रसाद करमरकर, शालेय समितीच्या अध्यक्ष निलीमा देशमुख, संस्था सदस्य समीर गांधी, प्रसाद फाटक आदी उपस्थित होते.

बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी

लांजा : कोरोना काळात तालुक्यातील ग्रामीण मार्गांवरील बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता कदम यांनी केली आहे. यासाठी लांजा आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

राजापूर : तालुक्यातील विलवडे येथील पूरजन्य स्थितीमुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. सरपंच दिनेश दळवी यांच्याकडे वस्तूंचे वितरण करण्यात आले.

वस्तूरूपी मदत

रत्नागिरी : येथील शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसतर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना वस्तूरूपी मदत वितरीत करण्यात आली. पाण्याच्या बाटल्या, बिस्कीटचे पुडे, जीवनावश्यक वस्तू, आदी साहित्य पाठविण्यात आले. राष्ट्रवादी आपल्यासोबत या अभियानाच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.

Web Title: Gurujan's felicitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.