आता धरणातील गळतीवरही लक्ष ठेवणार गुरुजी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:38+5:302021-07-08T04:21:38+5:30
टेंभ्ये : मंडणगड तालुक्यातील पणदेरी गावातील धरणाची गळती सुरू झाल्याने तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी व तेथील परिस्थितीची माहिती प्रशासनाला ...
टेंभ्ये : मंडणगड तालुक्यातील पणदेरी गावातील धरणाची गळती सुरू झाल्याने तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी व तेथील परिस्थितीची माहिती प्रशासनाला कळविण्यासाठी चक्क प्राथमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोरोना ड्युटीबरोबरच धरणातील पाणी गळतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही प्रशासनाने शिक्षकांवरच सोपवली आहे. जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांनी याच्याविरोधात तीव्र आवाज उठविला असून, ही ड्युटी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी सर्वानुमते करण्यात येत आहे.
पणदेरी गावातील धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने गळतीचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी व तेथील परिस्थितीची माहिती प्रशासनाला कळविण्यासाठी उपविभागीय अधिकारी दापोली यांनी दिलेल्या तोंडी सूचनेनुसार प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती मंडणगडचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी केली आहे. या ड्युटीवर जवळपास २१ शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दर दोन तासांनी सद्यस्थितीचा अहवाल संबंधित कार्यालयास कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शिक्षक व कर्मचाऱ्यांची ड्युटी चोवीस तासांसाठी निश्चित करण्यात आली आहे.
सध्या राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे शाळांमध्ये दुसरी ते दहावीसाठी सेतू अभ्यासक्रम सुरू आहे. यामुळे संघटनस्तरावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ड्युटी रद्द करण्यात यावी अशी मागणी होत असतानाच प्रशासनाने ही अजब ड्युटी लावल्यामुळे जिल्ह्यातील संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.