राजापुरात दीड लाखाचा गुटखा जप्त, दाेघे व्यापारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 05:52 PM2022-02-24T17:52:28+5:302022-02-24T17:52:56+5:30
या कारवाईत अंदाजे ४ लाख किंमतीचे एक चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे
राजापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि राजापूर पोलिसांनी राजापूर शहरातील दोन व्यापाऱ्यांवर धाड टाकून सुमारे १ लाख ३६ हजार २७० रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. या कारवाईत अंदाजे ४ लाख किंमतीचे एक चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.
जवाहर चौकातील दुकानदार असीम अब्दुल रझ्झाक डोसानी आणि लियाकत शौकत सय्यद अशी अटक केलेल्या दोघा व्यापाऱ्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि राजापूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत असीम अब्दुल रझ्झाक डोसानी याच्याकडे १ लाख ३२ हजाराचा तर लियाकत शौकत सय्यद याच्याकडे ४ हजार २७० रुपयांचा विविध कंपन्याचा गुटखा आढळला. दरम्यान, सापडलेला सर्व माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दोन्ही दुकानदारांविरुध्द भारतीय दंड विधान कलम २७२,२७३ आणि ३२८ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
यामध्ये असीम अब्दुल रझ्झाक डोसानी प्रकरणी राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर तर लियाकत शौकत सय्यद प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघाटे तपास करीत आहेत.
पाेलिसांनी अटक केलेल्या दोन्ही व्यापाऱ्यांना येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता असीम अब्दुल रझ्झाक डोसानीला २८ फेब्रुवारीपर्यंत तर लियाकत शौकत सय्यद याला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.