चिपळुणात २६ लाखांचा गुटखा जप्त, तीन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 06:00 PM2020-11-09T18:00:24+5:302020-11-09T18:01:21+5:30
चिपळूण शहरातील खाटीक आळी परिसरात मटण मार्केटजवळ असलेल्या नजराणा इमारतीच्या खाली गुटख्याने भरलेली मारुती इको व आयशर टेम्पो ही दोन्ही वाहने शुक्रवारी दुपारी काही नागरिकांनी पकडली आणि पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तीन गुटखा बहाद्दरांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले. गुटखा आणि दोन वाहनांसह सुमारे २६ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला. या संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
चिपळूण : शहरातील खाटीक आळी परिसरात मटण मार्केटजवळ असलेल्या नजराणा इमारतीच्या खाली गुटख्याने भरलेली मारुती इको व आयशर टेम्पो ही दोन्ही वाहने शुक्रवारी दुपारी काही नागरिकांनी पकडली आणि पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तीन गुटखा बहाद्दरांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले. गुटखा आणि दोन वाहनांसह सुमारे २६ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला. या संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी दशरथ बांबळे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात रात्री उशिरा तक्रार दिली. त्यानुसार आरोपी मुश्ताक कच्छी (रा. चिपळूण), अंकुश केसरकर व संदीप पाटील (दोघेही रा. सावंतवाडी) यांनी आपल्या ताब्यातील दोन्ही वाहनांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी सुपारी, पान मसाला भरुन वाहने उभी करुन ठेवली होती. याबाबत जागरुक नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी येत वाहनांची तपासणी केली असता, वाहनांमध्ये गुटखा असल्याचे निदर्शनाला आले.
याबाबत संबंधित वाहनधारकांकडे चौकशी केली असता, त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस खाक्या दाखवताच हा गुटखा इतर ठिकाणी विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली. याबाबत चिपळूण पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे, उपनिरीक्षक समद बेग, पोलीस नाईक आशिष भालेकर, पंकज पडेलकर, नाईक आदिती जाधव यांनी केली.