गुटख्याचे ‘कर्नाटक कनेक्शन’ तुटता तुटेना!, विक्री राजरोसपणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 02:01 PM2022-10-13T14:01:20+5:302022-10-13T14:01:37+5:30
केवळ पानपट्टी व टपरी व्यावसायिक नव्हे, तर बाजारपेठेतील काही व्यापारीही यात गुंतले असल्याने हे जाळे आणखी घट्ट होऊ लागले
चिपळूण : गेल्या काही महिन्यांपासून गुटखा विक्री राजरोसपणे सुरु आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. यामध्ये आता केवळ पानपट्टी व टपरी व्यावसायिक नव्हे, तर बाजारपेठेतील काही व्यापारीही गुंतले असल्याने हे जाळे आणखी घट्ट होऊ लागले आहे. त्याचे थेट कनेक्शन कर्नाटकपर्यंत असल्याचे बोलले जात असले, तरी या प्रकरणी तपास करणारी यंत्रणा अत्यंत कुचकामी ठरली आहे.
दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील कामथे व त्यानंतर कालुस्ते येथे गुटख्याचा छोटा कारखानाच आढळला होता. त्याचवेळी गुटख्याचा पुरवठा भंगार व्यावसायिकांमार्फत केला जात असल्याचे उघड झाले होते. पानपट्टी, टपरी व अन्य फेरीवाल्यांमार्फत त्याचे वितरण केले जात होते. मात्र आता या व्यवसायात काही व्यापारी उतरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाजारपेठेतील घाऊक विक्रेत्यांना हेरून त्यांच्याकडे नेहमी खरेदी करणाऱ्या छोट्या व ग्रामीण भागातील व्यावसायिकांना या जाळ्यात ओढले जात आहे. त्यातून नवी साखळी तयार झाली आहे. विशेषतः मुख्य बाजारपेठेसह आजूबाजूच्या छोट्या बाजारपेठेतही हे जाळे निर्माण झाले आहे. गतवर्षी चिपळूण शहरापासून काही अंतरावर असलेल्या अलोरे येथील कविता स्टॉलवर अलोरे शिरगाव पोलिसांनी छापा टाकून ३८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. त्याचवेळी सावर्डे बाजारपेठेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी एका जनरल स्टोअर्सच्या दुकानावर धाड टाकून ७५ हजार किमतीचा गुटखा व प्रतिबंधित केलेले पदार्थ जप्त केले. या प्रकरणी अमोल अशोक कोकाटे याला अटक करण्यात आली होती.
गुटखा प्रकरणात आतापर्यंत झालेल्या कारवाईत ठराविक व्यक्तींची नावे पुन्हा पुन्हा पुढे येत आहेत. मुश्ताक झिकर अब्दुल गणी कच्छी (चिपळूण) याच्याविरुद्ध सलग तीन वेळा गुन्हा दाखल झाला आहे. याच पद्धतीने गुटखा प्रकरणात काही व्यक्तींची नावे पुन्हा पुन्हा पुढे येत आहेत. तरीदेखील पोलीस यंत्रणा मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहचू शकलेली नाही. मागील एका प्रकरणात बेळगाव येथील मुख्य वितरकापर्यंत पोलीस पोहचले होते. परंतु त्यानंतरची कारवाई पूर्णतः थंडावली.
मुळात गुटख्याचे वितरणच कर्नाटकमधून होत असल्याचे याआधीही पोलिसांनी स्पष्ट केले होते. कर्नाटकमध्ये गुटख्याला बंदी नसल्याने त्याचा या व्यावसायिकांनी फायदा उठवला आहे. परंतु या प्रकरणातील संबंधित आरोपी हे सांघिक गुन्हेगारीत असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करता येत नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले होते. परंतु आता गुटखा विक्रीचे जाळे आणखी घट्ट झाल्याने व त्यात युवक व तरुण मुलं व्यसनाधीन झाल्याने पालक वर्ग चिंताग्रस्त बनला आहे.
मुख्य सूत्रधार मोकाटच
दहा दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई आणि रत्नागिरीच्या संयुक्त पथकाने येथील बाजारपेठेत धाड टाकली होती. या धाडीत दोन व्यापाऱ्यांकडून तब्बल साडेचार लाखाचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोन व्यापाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघांना अंतरिम जामीनही मंजूर झाला आहे. परंतु हे चौघेजण अद्यापही मोकाट आहेत. तसेच दहा दिवसांनंतरही या प्रकरणातील मुख्य सूत्रधारही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
गुटखा प्रकरणातील चार जणांवर गुन्हा दाखल असला, तरी अद्याप त्यांना अटक झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी झालेली चौकशी व तपासाची माहिती देता येत नाही. अजून या प्रकरणी तपास व चौकशी सुरू आहे. - रत्नदीप साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक, चिपळूण.