खेड पाठाेपाठ रत्नागिरीतही आढळला गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:42+5:302021-07-04T04:21:42+5:30
रत्नागिरी : खेड शहरात तब्बल साडेतीन लाखांचा गुटखा सापडल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री रत्नागिरी शहरातील मच्छी मार्केट परिसरात ...
रत्नागिरी : खेड शहरात तब्बल साडेतीन लाखांचा गुटखा सापडल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री रत्नागिरी शहरातील मच्छी मार्केट परिसरात करण्यात आली. या कारवाईत २,२५० रुपयांचा तंबाखू व विमल पान मसाला जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अश्रफ हजी दाऊद मेमन (४७, रा. झारणीरोड मच्छी मार्केट, रत्नागिरी) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
शासनाची बंदी असूनही जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी येत आहे. पानटपऱ्या बंद असल्या तरीही गुटख्याची विक्री माेठ्या प्रमाणात हाेत आहे, हे सिद्ध हाेत आहे. खेड शहरात पाेलिसांनी गुरुवारी साडेतीन लाखांचा गुटखा जप्त केला हाेता. यावेळी ताब्यात घेतलेल्या संशयिताने आपण ताे स्वत: विक्रीसाठी आणल्याचे सांगितले हाेते. त्याचवेळी त्याच्याकडे अधिक चाैकशी केली असता ताे रत्नागिरीतून आणल्याची माहिती पाेलिसांना दिली हाेती.
ही माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने मच्छी मार्केट येथून गुटखा ताब्यात घेतला. त्याच्याविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी दशरथ मारुती कांबळे (५६, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर करत आहेत.
------------------------
कर्नाटकातून गुटखा रत्नागिरीत?
कर्नाटक राज्यात गुटखा विक्रीला बंदी नाही. त्यामुळे हा गुटखा काेल्हापूर मार्गे रत्नागिरीत येत आहे. या भागातून येणाऱ्या भाज्या, फळे किंवा इतर सामानाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून हा गुटखा येत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतक्या माेठ्या प्रमाणात गुटखा येत असतानाच माहिती मिळाल्यानंतरच कारवाई का केली जाते, असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे.