रत्नागिरी जिल्ह्यातील व्यायामशाळा झाल्या अनलॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 07:32 PM2020-10-27T19:32:48+5:302020-10-27T19:36:32+5:30
Gymnasiums, CoronaVirus, Unlock, RatnagiriNews रत्नागिरी जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरू करण्यासाठी अखेर जिल्हा प्रशासनाने दसऱ्यादिनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांची तब्बल साडेसहा महिन्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. या व्यावसायिकांच्या दीर्घकाळसाठी बंद राहिलेल्या जीम आता पुन्हा सुरू होणार आहेत.
रत्नागिरी : जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरू करण्यासाठी अखेर जिल्हा प्रशासनाने दसऱ्यादिनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांची तब्बल साडेसहा महिन्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. या व्यावसायिकांच्या दीर्घकाळसाठी बंद राहिलेल्या जीम आता पुन्हा सुरू होणार आहेत.
२३ मार्चपासून आत्तापर्यंत शासनाला सहकार्य करण्याच्या भावनेने जिल्ह्यातील सर्व जीमचालकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. जिल्ह्यात सुमारे ५० नोंदणीकृत जीम असून, नव्याने सुरू झालेल्याही काही आहेत. या सर्व जीममध्ये मिळून ५०० - ६०० प्रशिक्षक तसेच अन्य कर्मचारी आहेत. मात्र, साडेसहा महिने व्यवसाय बंद राहिल्याने खर्च भागविणे अशक्य झाले होते. जीममधील कर्मचाऱ्यांचे पगार, जीमचे भाडे, वीजबिल तसेच अन्य खर्च भागवताना या व्यावसायिकांवरच उपासमारीची वेळ आली होती.
देशभरात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारने हळुहळू सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, जीमबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. नागरिकांना सुदृढ ठेवण्याच्या भावेनेने अनेकांनी लाखो रूपयांचे कर्ज काढून भाड्याच्या जागेत जीम सुरू केल्या आहेत. पावसाळ्यात तर जीममधील लाखो रूपये किंमतीच्या मशिन्स वापराविना गंजू लागल्या. त्यामुळे या व्यावसायिकांसमोर आर्थिक समस्यांचा डोंगर उभा राहिला होता.
अनलॉकची प्रक्रिया देशभर सुरू झाल्यानंतर बहुतांशी उद्योग - व्यवसाय सुरू झाले. अखेर जीमचालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कोरोनाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळण्याचे शासनाला आश्वासनही दिले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय लवकरच घेण्याचे राज्य जीम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले होते. त्यानुसार अखेर जीम सुरू करण्याबाबत राज्य शासनाने अनुकुलता दाखवली.
शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने व्यायामशाळा चालकांच्या समस्या लक्षात घेऊन अखेर व्यायामशाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे आम्ही सर्व व्यावसायिक त्यांचे ऋणी आहोत.
- भाई विलणकर,
अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा जीम व्यावसायिक असोसिएशन