बारावीचे पेपरवाटप चक्क दुचाकीवरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 04:36 PM2019-02-25T16:36:59+5:302019-02-25T16:37:52+5:30
दहावी, बारावीच्या परीक्षा काळात पेपर फुटू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. परंतु, रत्नागिरी तालुक्यातील बारावी परीक्षेच्या पेपरची मात्र चक्क दुचाकीवरून ने - आण केली जात आहे. शिक्षकासमवेत एक पोलीस कर्मचारी देऊन दुचाकीवरून ही वाहतूक केली जात आहे.
रत्नागिरी : दहावी, बारावीच्या परीक्षा काळात पेपर फुटू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. परंतु, रत्नागिरी तालुक्यातील बारावी परीक्षेच्या पेपरची मात्र चक्क दुचाकीवरून ने - आण केली जात आहे. शिक्षकासमवेत एक पोलीस कर्मचारी देऊन दुचाकीवरून ही वाहतूक केली जात आहे.
राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. या परीक्षेसाठी देण्यात येणारे पेपर विद्यार्थ्यांच्या हाती लागू नयेत, कोणत्याही विषयाचा पेपर फुटू नये यासाठी विशेष गोपनीयता पाळली जाते. त्यादृष्टीने पोलिसांसह विशेष पथकांचीही नियुक्ती करण्यात येते.
रत्नागिरी तालुक्यात परीक्षेसाठी असणाऱ्या केंद्रांवर मात्र हे पेपर शिक्षकांमार्फत दुचाकीवरून नेण्यात येत आहेत. शहरातील एका शाळेतून हे गठ्ठे शिक्षकांच्या ताब्यात देण्यात येतात. त्यानंतर हे गठ्ठे एका पोलिसाच्या मदतीने शिक्षकांच्या दुचाकीवरून परीक्षा केंद्रापर्यंत नेण्यात येत आहेत.
परीक्षा संपल्यानंतर मुलांच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पुन्हा दुचाकीवरून त्या शाळेपर्यंत आणण्यात येत आहेत. तालुक्यात गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, पटवर्धन हायस्कूल, नवनिर्माण हायस्कूल, एम्. एस्. नाईक हायस्कूल, पाली, गावडेआंबेरे अशी परीक्षा केंद्र आहेत.