हलगर्जी ठेकेदार काळ्या यादीत
By admin | Published: November 27, 2014 10:48 PM2014-11-27T22:48:32+5:302014-11-28T00:07:02+5:30
चिपळूण नगरपरिषद : ...अन्यथा आंदोलन
चिपळूण : शहरातील विविध विकासकामे गेली अनेक वर्षे प्रलंबित असून, मुदतीत कामे न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शहरात मटण, मच्छी मार्केट, महर्षी अण्णासाहेब कर्वे मंडई त्याचप्रमाणे अन्य विविध विकासकामे अद्याप पूर्णत्त्वास गेलेली नाहीत. विकासकामांसाठी नगर परिषद प्रशासनातर्फे लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. प्रलंबित कामांची प्रशासनाने दखल घ्यावी, या उद्देशाने मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांची भेट घेतली. यावेळी रविकांत काणेकर, राकेश घोरपडे, मुनाफ हमदुले, भाऊ भाटकर, किरण विचारे, बाबा कदम आदींसह मनसेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ज्या ठेकेदारांनी काम घेऊनही मुदतीत पूर्ण केले नाही, तर त्यांना काळ्या यादीत टाका. ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत. २८ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत कामांना विलंब करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा ठराव करण्यात यावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. ठेकेदार कामे वेळेत करत नाहीत. उलट मुदतवाढ मागून वेळ मारुन नेत आहेत. अशा ठेकेदारांना पुढील कामाचा ठेकाही देऊ नये, असे झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरुद्ध आंदोलन छेडेल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे. दर्जेदार कामे करतील, अशा ठेकेदारांनाच कामे देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
ठेकेदाराने काम घेतले आणि ते विहीत मुदतीत पूर्ण केले नाही, तर संबंधिताला काळ्या यादीत टाकावे, एक काम पूर्ण होत नसेल, त्या ठेकेदाराला यापुढील काम देऊ नये. पहिले काम पेंडिंग असताना दुसरे काम दिल्यास मनसेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल.