चिपळुणात मदत स्वीकारतानाही 'हमरीतुमरी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:36+5:302021-07-28T04:33:36+5:30
चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर येथे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या मदतीसाठी अनेक संस्था व राजकीय पक्ष सरसावले आहेत. ...
चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर येथे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या मदतीसाठी अनेक संस्था व राजकीय पक्ष सरसावले आहेत. मात्र या मदतीचे वाटप करण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याने कोणाला अधिक मदत मिळत आहे, तर कोणाला अजिबात मदत मिळालेली नाही. ही मदत स्वीकारताना काही ठिकाणी हमरीतुमरीचे प्रकारही घडल्याचे समोर येत आहे. काही भागांत तर गाड्या अडवून मदत हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी (दि. २३) सकाळी पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही तासांतच पाणी, बिस्किटे व अन्य खाद्यपदार्थ घेऊन रत्नागिरी, दाभोळ, जयगड येथील कार्यकर्ते येथे दाखल झाले. तेव्हापासून आजतागायत ही मदत सर्व भागांतून पुरविली जात आहे. उलट दोन दिवसांत मदतीचा ओघ आणखी वाढला आहे; परंतु ही मदत पूरग्रस्तांना न मिळता भलतेच हिसकावून घेत आहेत. खरे तर पुरात सापडलेली कुटुंबे अजूनही साफसफाईच्या कामात गुंतून आहेत. तसेच रस्त्यावर मदत येत असल्याने अनेकजण मदत स्वीकारण्यास पुढे येत नाहीत; परंतु काहीजण पूरग्रस्त नसतानाही रस्त्यावर दिवसभर थांबून मदत आधीच लाटत आहेत.
सध्या बाजारपेठ उद्ध्वस्त झाल्याने सर्वांनाच मदतीची गरज भासत आहे. अनेकांकडे कपडे, धान्य असल्याने ते मदतीची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र मदत वाटपात सुसूत्रता नसल्याने आता मदत वाटपासाठी बाहेरून येणाऱ्यांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे ठरावीक भागातच मदत दिली जात आहे. त्यामुळे पुरामध्ये ज्यांचे नुकसान झालेले नाही ती पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरील माणसे रस्त्याच्या कडेला उभी राहून, गाड्या अडवून मदत सरळसरळ हिसकावून घेत आहेत, आपली घरे भरत आहेत. तर ज्यांचे घर आणि ऑफिस, दुकान पुराखाली गेले आहे त्या व्यक्ती आपले घर, दुकान साफ करीत आहेत. त्यांच्यापर्यंत खरोखरच मदत पोहोचत नाही. ते परिस्थितीशी झगडत आहेत, त्यांना कोणतीच जीवनोपयोगी मदत मिळत नाही; म्हणून ज्या बाहेरून येणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना मदत घेऊन येत आहेत, त्यांनी बाधित व्यक्तीच्या घरात जाऊन मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.
..............................
रस्त्यावर आपली गाडी उभी करून मदत वाटू नये; कारण फार चुकीच्या पद्धतीने मदत दिली आणि घेतली जात आहे. पण जो खराेखर बाधित आहे, तो मात्र मदतीपासून वंचित आहे. त्यामुळे मदत देताना काळजी घेणे गरजेचे आहे.
- संजय चव्हाण, मराठा क्रांती मोर्चा, चिपळूण.
.....
मदतीसाठी आलेल्या गाड्यांना मज्जाव
येथील बाजारपेठेतील परकार कॉम्प्लेक्स परिसरात तीन गाड्या मंगळवारी मदत घेऊन आल्या होत्या. यावेळी या गाड्या धवलघाग सुपर बाजार येथे वाहतूक कोंडीत अडकल्या. यावेळी काहींनी धवल घाग येथील पार्किंगमध्ये मदतीच्या गाड्या सोडण्यास विनंती केली. मात्र तेथील सुरक्षारक्षकांनी वाहने आत सोडण्यास मज्जाव केला. यामुळे काही नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेर तीन गाड्या आतमध्ये सोडण्यात आल्या.