कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:26+5:302021-04-27T04:32:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : कोरोनाने मृत्यू होणाऱ्या व्यक्तीचे पार्थिव हे त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात यावे व शासनाचे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : कोरोनाने मृत्यू होणाऱ्या व्यक्तीचे पार्थिव हे त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात यावे व शासनाचे सर्व अटी व शर्तीनुसार त्या मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार त्या कुटुंबीयांना करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी राजापूरचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
तसे निवेदन काझी यांनी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार दीपाली पंडित यांच्याकडे दिले आहे. यावेळी राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुलतान ठाकूर, जामा मशिदीचे अध्यक्ष वजुद्दिन मुल्ला, नगरसेवक हनिफ युसुफ काझी, कलीम मुल्ला, सुफयान मुल्ला, साखरी नाटेचे मुश्ताक हुश्ये, मजिद कोतवडकर, अलिमियॉ वाडकर, शोएब मिरकर उपस्थित होते.
काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्या व्यक्तीचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात न देता त्याची प्रशासन स्तरावर परस्पर स्मशानात नेऊन दहन केले जाते. त्यावेळी कुटुंबीयांनाही मृत व्यक्तीचे शेवटचे दर्शन होत नाही. मृत झालेली व्यक्ती ही मग ती हिंदू असो वा मुस्लिम अथवा कोणत्याही जातीधर्माची असो त्या व्यक्तिचे संपूर्ण आयुष्य कुटुंबीयांसमवेत गेलेले असते. त्यांचे शेवटचे दर्शन व्हावे अशी प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे कोरोना महामारीच्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीवर मृत्यू ओढावल्यास त्याचे किमान पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
......................................
राजापूर प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना हनिफ काझी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. राजापूर प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना हनिफ काझी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.