सुवर्णपेढ्यांमध्येही हातसफाई !
By admin | Published: May 30, 2016 12:37 AM2016-05-30T00:37:58+5:302016-05-30T00:38:24+5:30
रत्नागिरीत चारजणांना अटक : लांजा, सांगलीतही चोरीची कबुली; दागिन्यांसह स्कॉर्पिओही जप्त
रत्नागिरी : रत्नागिरीत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पकडलेल्या चोरट्यांच्या टोळीने लांजा व सांगली येथील सुवर्णपेढ्यांमध्येही चोरी केल्याची कबुली दिली आहे, तर या टोळीकडे असलेली स्कॉर्पिओ गाडी ही राज्यभरात फिरत असल्याची माहिती चालकाने पोलिस तपासात दिली आहे.
या टोळीने गेल्या काही दिवसांत राज्यभरातील सुवर्णपेढ्यांमध्ये हातचलाखी करीत सोन्याचे दागिने लंपास केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली आहे. अन्य ठिकाणच्या चोऱ्यांबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सुवर्णपेढीत रुबाबात जायचे व दागिने पाहतानाच त्यातील काही दागिने हातचलाखीने लंपास करायचे, असा पकडलेल्या टोळीचा गोरखधंदा आहे. या टोळीने गेल्या काही महिन्यांत राज्यभरात हातसफाई केली होती. मात्र, या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. २८ मे रोजी ही टोळी त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ (एमएच १२ डीएस ४९१२)ने दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीत आली. मारुती मंदिर येथील पी.एन. ज्वेलर्समध्ये त्यांनी दागिने खरेदीचा बहाणा करीत दागिने लंपास केले. याचवेळी रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना मारुती मंदिरजवळील पी.एन. ज्वेलर्ससमोर काहीजण स्कॉर्पिओमधून संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी के. सी. जैननगरपर्यंत पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्योत्स्ना सूरज कछवाय (वय ३०), सूरज मदनसिंग कछवाय (२७), कमल विनोद राठोड (३०) व स्कॉर्पिओ चालक संदीप राम जाधव (३५, सर्व रा. कात्रज, पुणे) यांचा समावेश आहे. ज्योत्स्ना व सूरज हे पती-पत्नी असून, त्यांच्यासोबत असलेल्या दोन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासात त्यांनी सांगली येथील गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास लांजा येथील रवी खेडेकर यांच्या सुवर्णपेढीतून सात हजारांचे दागिने लंपास केल्याचीही कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख ४० हजार बाजारमूल्य असलेले आठ तोळे सोने, ५१ हजार रोख रक्कम तसेच स्कॉर्पिओ गाडी मिळून दहा लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अप्पर अधीक्षक तुषार पाटील, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्ही. टी. धनोकार, मामा कदम, सहायक फौजदार सुभाष माने, संदेश सारंग, हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे, पोलिस नाईक संदीप कोळंबेकर, संदीप मालप, विजय आंबेकर, अमोल भोसले, रवी पाटील, सुशील पंडित, चालक दत्ता कांबळे, स्नेहा पेडणेकर यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
चोरट्यांची राज्यभर फिरती
गेल्या काही काळापासून राज्यभरातील सुवर्णपेढ्या लक्ष्य करणाऱ्या या चोरट्यांच्या टोळीने अनेक ठिकाणी हातचलाखीचा वापर केल्याचे तपासात पुढे येण्याची शक्यता आहे. या टोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीचा चालक संदीप राम जाधव याची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता ही टोळी मुंबई, कणकवली, लांजा, रत्नागिरी, अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, औरंगाबाद, इंदापूर, टेंबुर्णी, निगडी, पिंपरी या ठिकाणी फिरत असल्याचे निष्पन्न झाले. याठिकाणीही अनेक चोऱ्या झाल्या असून, त्यामागे या टोळीचा हात असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.