तरूण मतदारांच्या हाती, भावी आमदारांची खोती, प्रचाराच्या दिशा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:38 PM2019-09-24T13:38:05+5:302019-09-24T13:40:37+5:30
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील पाच मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ टक्के असून, त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या १३.२९ टक्के आहे.
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील पाच मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ टक्के असून, त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या १३.२९ टक्के आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरीचा कार्यभार स्वीकारताच मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, नवमतदारांनी मतदानासाठी पुढे यावे, यादृष्टीने उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही २०१४ च्या तुलनेने अधिक मतदार होते.
यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात १३ लाख ०८ हजार ८०० मतदार निश्चित झाले आहेत. यापैकी ६ लाख २६ हजार ९०६ एवढे पुरूष तर ६ लाख ८१ हजार ४८४ एवढी महिला मतदारांची संख्या आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी १२ लाख ३९ हजार २०१ एवढे मतदार होते. यावर्षी त्यात ६९ हजार ५९९ने वाढ झाली आहे.
दिनांक १ जानेवारी २०१९च्या अर्हतावर आधारित प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार, एकूण मतदारांची संख्या १३ लाख ६ हजार ५२८ इतकी असून, त्यातील ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या २ लाख ७५ हजार ३७९ इतकी आहे तर त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदार २ लाख ५३ हजार ४४८ इतके आहेत. ८० वर्षावरील मतदारांची संख्या केवळ १.७८ टक्के (५५ हजार ६८९) इतकी आहे.
सध्या जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तरूण मतदारांमध्ये जागृतीचे काम सुरू आहे. त्यामुळे या मतदारांच्या संख्येत वाढ होत आहे. १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या ३० हजार असली तरी २० ते २९ या वयोगटातील तरूण मतदारांची संख्या १४ टक्के म्हणजेच २ लाख २६ हजार २६४ इतकी आहे.
नवमतदारांमध्ये आता मतदानाच्या हक्काबाबत जागृती निर्माण होत आहे. २४ सप्टेंबरपर्यंत मतदारांना नावनोंदणी करण्याची संधी आहे. यामुळे नवीन मतदारांमध्ये वाढ होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदारांची संख्या वाढणार आहे.
प्रशासनाचे उपक्रम
मतदारांमध्ये जागृती वाढावी, तसेच नवमतदारांमध्येही मतदानाच्या हक्काबाबत जाणीव निर्माण व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम रागविले जात आहेत. सध्या जिल्हाभर व्हीव्हीपॅट मशीन तसेच मतदान प्रक्रियेबाबत माहिती व्हावी, यासाठी गावोगावी जावून प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत.
२४ सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणीची संधी
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी २४ सप्टेंबरपर्यंत मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळाली आहे. या मतदारांना २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत हक्क बजावता येणार आहे.