गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हापूस बाजारात दाखल, बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट; दर काय.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 01:03 PM2023-03-23T13:03:37+5:302023-03-23T13:04:22+5:30
राज्याच्या अनेक भागांतून आंबा आल्याने वाशी मार्केटला आवक वाढली
रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा काही भागांतच आहे. उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागल्याने बागायतदार आंबा काढून विक्रीला पाठवीत आहेत. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर वाशी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस दाखल झाला.
बुधवारी वाशी मार्केटला ५० हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. गतवर्षी गुढी पाडव्याला वीस हजार पेट्या विक्रीला होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक अधिक असून, दर ५०० रुपयांनी कमी झाला आहे. सध्या पेटीला १५०० ते ४५०० रूपये दर मिळत आहे.
यावर्षी पावसाळा बराच लांबला. त्यामुळे उशिरापर्यंत झाडांना पालवी येत राहिली. यावर्षी थंडीचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे फुलोरा पाहिजे तेवढा झाला नाही. जानेवारीतील थंडीमुळे झाडांना फुलोरा आला. मात्र, फळधारणा अपेक्षेइतकी झाली नाही. जिल्ह्यात पावस, राजापूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा अधिक आहे. मात्र, जिल्ह्याच्या अन्य भागांत आंबा नसल्याने बागायतदार चिंतेत आहेत. आंब्यावर कीडरोड, तुडतुडा, बुरशी, थ्रीप्सचा प्रादुर्भाव अद्याप आहे.
फुलोरा आल्यापासून वानरांचा त्रास सुरू होतो. त्यामुळे राखणीसाठी नेपाळी बागेत ठेवले जातात. काही बागायतदारांकडे आंबाच नसल्याने कीटकनाशक फवारणीपासून राखणीसाठी केलेला खर्च भागविणे अशक्य होणार आहे.
गुढी पाडव्याला मुहूर्त
गुढी पाडव्याला मुहूर्ताची आंबा पेटी पाठवून कोकणातील बागायतदार आंबा विक्रीची सुरुवात करतात. दरवर्षी वाशी बाजार समितीत ५० ते ६० हजार पेट्या विक्रीला असतात. गतवर्षी हे प्रमाण कमी होते. २० हजार पेट्याच विक्रीला होत्या. यावर्षी पेट्या वाढल्या आहेत. अर्थात त्यात अजूनही कोकणातील आंबा कमी आहे.
आंबा हंगामाचे चित्रच वेगळे आहे. दरवर्षी सुरुवातीला आंबा कमी असतो. मात्र, यावर्षीही मोजक्याच बागायतदारांकडे आंबा आहे, अन्य बागायतदारांकडे कामच नसल्याने ते बसून आहेत. पाडव्याला राज्याच्या अनेक भागांतून आंबा आल्याने वाशी मार्केटला आवक वाढली होती. - राजन कदम, बागायतदार