हापूसच्या माहेरघरी आलाय आफ्रिकेतील हापूस, रत्नागिरीत ‘मलावी हापूस’ची चर्चा
By मेहरून नाकाडे | Published: December 22, 2022 01:24 PM2022-12-22T13:24:36+5:302022-12-22T13:25:02+5:30
गेल्या पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे.
मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : हापूस आंब्याचे मूळ घर म्हणून परिचित असलेल्या रत्नागिरीत सध्या पूर्व आफ्रिकेतील ‘मलावी हापूस’ आंब्याची चर्चा सुरू झाली आहे. १४ ते १५ आंबे असलेला एक खोका चार ते पाच हजार रुपये दराने विकण्यात येत आहे. आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक खोक्यांची जिल्ह्यात विक्री झाली आहे. दर कडकडीत असतानाही केवळ हापूसची भुरळ असणारे खवय्ये अधिक पैसे मोजत आहेत.
दरवर्षी वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये फेब्रुवारीत हापूस आंब्याची आवक सुरु होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. यावर्षी अद्याप आंब्याला पालवी असून, किरकोळ मोहोर सुरू झाला आहे. थंडीही गायब आहे. त्यामुळे एकंदर आंब्याचे उत्पादन कमीच राहणार असल्याचे बागायतदार सांगत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची पहिली पेटी बाजारात गेली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु होण्यात अजून बराच अवधी आहे. यंदा आंब्याचे उत्पादन कमीच राहणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. परतीच्या पावसानेही हापूसला दणका दिला आहे. एकीकडे स्थानिक हापूस लांबणीवर पडणार असल्याचे दिसत असताना मलावी या आफ्रिकन देशातील हापूस रत्नागिरी बाजारपेठेत दाखल झाला आहे.
कसा आहे मलावी देश?
- मलावी हा पूर्व आफ्रिकेतील गरीब आणि अविकसित देश आहे. त्याची लोकसंख्या दीड कोटींच्या आसपास आहे. या देशाच्या दोन बाजूंना टांझानिया, एका बाजूला झांबिया तर इतर बाजूंना मोझांबिक हे देश आहेत. मलावी मधील हवामान कोकणासारखे आहे.
- २०११ साली मलावीतील काही शेतकऱ्यांनी भारतात येऊन कोकणातून आंब्याची कलमे नेऊन ४५० एकर जमिनीवर लागवड केली होती. नोव्हेंबरपर्यंत या आंब्याची आवक होते. यावर्षी तेथील हंगामही लांबला आहे.
- गेल्या पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे. तेथे आंब्याचा हंगाम ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये असतो. त्यावेळी रत्नागिरी, देवगड हापूस बाजारात नसतो. कोकणपट्ट्यातील विविध भागातून हापूस आंबा जानेवारीनंतर बाजारात येतो. त्यामुळे कोकणातील हापूसला मलावी आंब्याचा फटका बसत नाही.
इंधनाचे दर वाढल्यामुळे हवाई वाहतूक महाग झाली आहे. त्यासह आयात आणि अन्य करांमुळे आंब्याचे दर वाढले आहेत. एका खोक्यामध्ये १४ ते १५ आंबे असतात. चार ते पाच हजार रुपये दराने बाॅक्सची सुरू आहे. आतापर्यंत माझ्या स्टाॅलवर ४० बाॅक्सची विक्री केली आहे. - रमेश श्रीनाथ, फळविक्रेता, रत्नागिरी