हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्याकडे!
By Admin | Published: May 20, 2016 10:15 PM2016-05-20T22:15:30+5:302016-05-20T22:48:34+5:30
संजय पानसरे : गतवर्षीच्या तुलनेत आवक घटली
रत्नागिरी : आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्यात आला आहे. येत्या आठवडाभरात हापूस आंबा हंगाम संपणार असला तरी कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात येथून आंब्याची आवक सुरू झाली आहे. यावर्षी वाशीच्या फळ मार्केटमध्ये एक कोटी पेट्या विक्रीला गेल्या आहेत. उत्पादन कमी असल्याने गतवर्षीच्या तुलनेत आवक घटल्याचे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी यावर्षी झाल्याने हंगामापूर्वी मोहोर प्रक्रिया सुरू झाली. मोहोराची शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे जपणूक केल्यामुळेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात आला. यावर्षी उत्पादन लवकर आले तरी हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट झाली आहे. पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे फळांची गळ झाली. शिवाय उच्च तापमानामुळे फळे भाजली.
आंबा पिकासाठी लागणारी खते, मोहोर, फळे संरक्षणार्थ वापरण्यात येणारी कीटकनाशके, मजुरी, पॅकिंग, इंधनखर्च, वाहतूक, हमाली, दलाली शिवाय महागाईमुळे वाढलेले दर वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम निश्चितच तूटपूंजी आहे. हवेतील गारठ्यामुळे मोहोरप्रक्रिया सातत्याने होत राहिल्याने फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाली. जेमतेम २५ ते ३० टक्के पीक शिल्लक राहिले. गतवर्षी दीड ते पावणेदोन कोटी पेट्या वाशी मार्केटमध्ये विक्रीला गेल्या होत्या. मात्र, यावर्षी जेमतेम एक कोटीपेट्या विक्रीस गेल्या आहेत. हापूसचा हंगाम आठवडाभरात संपणार आहे.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंबा बाजारात विक्रीला आला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याची आवक चांगली झाली. मात्र, नंतर आंब्याची आवक मंदावली. परंतु मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आवक वाढू लागली.
सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसबरोबर पायरी तसेच गुजरात, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून बदामी, केशर, लालबाग, राजापुरी, बैंगनपल्ली, तोतापुरी आंबा सुरू झाला आहे. लवकरच गुजरातमधून बलसाड, दशहरी आंब्याची आवक सुरू होणार आहे. यावर्षी वाशी मार्केटमध्ये कोकणातील हापूस कमी असला तरी कर्नाटक व दक्षिणेकडचा आंबा मुबलक प्रमाणात विक्रीला आला होता.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यावर्षी जेमतेम एक कोटीच्या आसपास आंबा विक्रीला गेल्या. हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. ५०० रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. सुरुवातीला हापूसपेटीला पाच हजारापर्यंत दर लाभला. यावर्षी उत्पादन कमी असले तरी दर घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
कॅनिंगला सुरुवातीला ३० रूपये दर लाभला. मात्र, पेट्यांचा दर घसल्यामुळे कॅनिंचाही दर घसरला आहे. २५ ते २८ रुपये किलो दराने खरेदी सुरू आहे. आठवडाभरात हापूसचा हंगाम संपणार आहे. शेतकरी शोधणीचा आंबा काढत आहेत. पाऊस लांबणीवर गेला, तर आंबा काढण्यात यश मिळेल. (प्रतिनिधी)
बदलते हवामान : बागायतदारांची चिंताही यंदा अधिकच
यंदा वारंवार बदलणाऱ्या हवामानाने हापूस आंब्याला छळले. त्यामुळे आंबा बागायतदारांची आणखीन चिंता वाढली. या हवामानाचा प्रतिकूल परिणाम हापूसवर होत आहे. त्यामुळे दरवर्षी हापूसचे पीक टप्प्याटप्प्याने घसरत आहे. २० मे नंतर हापूसचा हंगाम संपुष्टात येणार आहे.
कॅनिंगला हापूस...
यावर्षी हापूसच्या हंगामाची सुरुवातच उशिराने झाली आणि हंगामाचा शेवट त्यामानाने लवकर होत असल्याने यंदाचा हापूस हंगाम हा खूपच कमी राहिला आहे. सध्या हापूस आंबा कॅनिंगला पाठवणे सुरु झाले आहे.