कोकणचा हापूस मुंबईच्या बाजारात, सर्वाधिक पेट्या सिंधुदुर्गातून; दर काय...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:25 PM2024-02-27T12:25:52+5:302024-02-27T12:27:39+5:30

कर्नाटकचा आंबा विक्रीला

Hapus of Konkan in Mumbai market, most boxes from Sindhudurga | कोकणचा हापूस मुंबईच्या बाजारात, सर्वाधिक पेट्या सिंधुदुर्गातून; दर काय...जाणून घ्या

कोकणचा हापूस मुंबईच्या बाजारात, सर्वाधिक पेट्या सिंधुदुर्गातून; दर काय...जाणून घ्या

रत्नागिरी : आपल्या अविट गाेडीने साऱ्यांना भुरळ घालणारा ‘हापूस’ आता बाजारात दाखल झाला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील ए.पी.एम.सी. बाजारात साेमवारी काेकणातून पाच हजार आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. यामध्ये सर्वाधिक (६० टक्के) हापूस पेट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तर ४० टक्के आंबारत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील आहेत. बाजारात दाखल झालेल्या आंबा पेटीला सध्या दोन ते पाच हजार रुपये इतका भाव मिळत आहे.

गतवर्षी पाऊस कमी झाल्याने ऑक्टोबर हीट चांगली जाणवली. त्यामुळे थंडी सुरू होताच नोव्हेंबरमध्ये मोहर प्रक्रिया सुरू झाली. मात्र, डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक बागायतदारांच्या बागेत मोहर कुजला. अवकाळी पाऊस, हवामानातील चढउतार यामुळे तुडतुडा, थ्रीप्स, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. विविध कीटकनाशक फवारण्या करून तुडतुडा, बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळविण्यात शेतकऱ्यांना यश आले.

नैसर्गिक दृष्टचक्रातून वाचलेला आंबा तयार होऊन बाजारात जानेवारीपासून येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, याचे प्रमाण किरकोळ होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. त्या तुलनेने रत्नागिरीचे प्रमाण अल्प आहे. सध्या रात्री गारठा व दिवसा उष्मा, असे तापमान असले तरी शेतकरी तयार आंबा काढून विक्रीला पाठवू लागले आहेत.

काही ठराविक बागायतदारांकडेच पहिल्या टप्प्यातील आंबा असून, ताे मुंबई, पुणे बाजारात विक्रीसाठी पाठविला जात आहे. गतवर्षी याच दिवसात पाच ते सहा हजार पेट्या विक्रीला येत होत्या, असे वाशी येथील विक्रेत्यांनी सांगितले.

कर्नाटकचा आंबा विक्रीला

सध्या बाजारात कर्नाटक हापूस, बदामी, लालबाग, तोतापुरी आंबा विक्रीसाठी येत आहे. हापूस ८० ते १७५ रुपये किलो, बदामी ६० ते १२० रुपये किलो, लालबाग १०० ते १४० रुपये किलो, तोतापुरी ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून हापूस विक्रीसाठी येत आहे. या आठवड्यापासून आवक वाढली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसचे प्रमाण ६० टक्के आहे. उर्वरित ४० टक्के आंबा रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील आहे. आंब्याच्या वर्गवारी, दर्जानुसार दर आकारण्यात येत आहेत. - संजय पानसरे, संचालक, ए.पी.एम.सी. मार्केट, वाशी (नवी मुंबई)

Read in English

Web Title: Hapus of Konkan in Mumbai market, most boxes from Sindhudurga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.