खेडमध्ये हापूसचे दर चढेच; ग्राहकांची खरेदीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:29 AM2021-05-15T04:29:50+5:302021-05-15T04:29:50+5:30
खेड : गेल्या काही दिवसांपासून हापूस आंबा तीनबत्तीनाका येथे विक्रीसाठी दाखल झाला आहे. मात्र, हापूसचे दर चढेच असल्याने ग्राहकांनी ...
खेड : गेल्या काही दिवसांपासून हापूस आंबा तीनबत्तीनाका येथे विक्रीसाठी दाखल झाला आहे. मात्र, हापूसचे दर चढेच असल्याने ग्राहकांनी हापूस खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सद्यस्थितीत छोट्या आकाराच्या फळांचा दर शेकडा २६०० रुपये आहे, तर मोठ्या हापूसची तीन हजार रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे. सकाळी ७ ते ११ यावेळेतच आंबा विक्रेत्यांना बसण्याची मुभा देण्यात आल्याने हापूस खरेदीला अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. एसटी बसेस बंद असल्याने ग्रामीण भागातून शहरात हापूसची विक्री करण्यासाठी यायचे कसे? असा प्रश्न आंबा विक्रेत्यांना सतावत आहे. काही आंबा विक्रेते खासगी वाहनांद्वारे आर्थिक भुर्दंड सहन करून हापूसची विक्री करण्यासाठी येथे दाखल होत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या कडक निर्बंधांमुळे नागरिकांची वर्दळ कमी प्रमाणात असल्याने याचा फटका आंबा विक्रेत्यांना बसत आहे. दहा दिवसांपूर्वी हापूसचा दर शेकडा ४ हजार रुपये होता. मात्र, हापूसच्या दरात घसरण होऊन सद्यस्थितीत शेकडा ३ हजार रुपये दराने हापूस विकला जात आहे. मात्र, हा दर चढाच असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. एकीकडे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. ३ हजार रुपये शेकडा दराने हापूस खरेदी करायचा कसा? असा प्रश्नदेखील काहींना पडला आहे. याचमुळे हापूसची चव बेचव झाली आहे. आंबा व्यावसायिकही चिंतेत अडकले आहेत.
शहरात शंकराच्या मंदिराजवळील मोकळ्या जागेत आंबा व्यावसायिकांना बसण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी सकाळी ७ ते ११ ही वेळ निर्धारित केली आहे. यासाठी खाडीपट्ट्यातून हापूस विक्रीसाठी येणारे आंबा व्यावसायिक पहाटे दाखल होत आहेत. मात्र, ग्राहकांअभावी आंबा व्यावसायिकांना तासनतास तिष्ठतच बसावे लागत आहे. त्यासाठी काही आंबा व्यावसायिकांनी दर कमी करून ग्राहकांना थेट घरपोच डिलिव्हरी करण्याची शक्कल लढवली आहे.
----------------------------
khed-photo144
खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे हापूस आंबा विक्रीसाठी आणण्यात येत आहे. मात्र, चढ्या दरामुळे खेडमधील ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.