गुढीपाडव्याचा मुहूर्त यंदाही हापूसला हुकणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:29 AM2021-04-12T04:29:02+5:302021-04-12T04:29:02+5:30
रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे आंब्याचे उत्पादन लवकर येत असले तरी ऋतुचक्राचा फटका आंबा पिकाला बसल्याने उत्पादनात ...
रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे आंब्याचे उत्पादन लवकर येत असले तरी ऋतुचक्राचा फटका आंबा पिकाला बसल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, १५ एप्रिलपासून आंबा बाजारात टप्प्याटप्प्याने येण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याला आंबा विक्रीला पाठवून व्यवसायाचा मुहूर्त अनेकजण करतात. त्यामुळे सोमवारी आंबा तोड करून वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठविण्याची शक्यता आहे. गतवर्षी कोरोनामुळे मार्केट बंद असल्याने गुढीपाडव्याचा मुहूर्त शेतकऱ्यांना साधता आला नव्हता. यावर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊनचे सावट असले तरी मुहूर्त साधण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे.
बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्यामुळे उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. मुंबई उपनगरात दहा हजारपेक्षा अधिक किरकोळ व्यापारी, तर वाशी मार्केटमध्ये ६०० घाऊक व्यापारी आहेत. वाशी येथून हापूस खरेदी करून उपनगरातून विकण्यात येतो. बहुतांश शेतकरी वाशी मार्केटवर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी हापूसच्या उत्पादनावर कमालीचा फरक झाला आहे. सध्या १२ ते १५ हजार पेट्या वाशी मार्केटमध्ये कोकणातून विक्रीला पाठविण्यात येत आहेत. पाडव्यासाठी काही शेतकरी आंबा काढून विक्रीला पाठविण्याच्या तयारीत आहेत. गतवर्षी गुढीपाडवा सणावेळी लाॅकडाऊनमुळे मार्केट बंद होते. त्यानंतर शासनाकडून आंबा विक्रीला परवानगी मिळाली होती. मात्र, वाशी मार्केटमध्येच कोरोना रुग्ण सापडल्याने विक्री व्यवस्था बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी विक्रीवर अवलंबून राहावे लागले होते.
चाैकट
गेल्या चार वर्षांतील आवक व दर पुढीलप्रमाणे :
वर्ष आंब्याची आवक दर
२०१७ ६०,००० १०००-३५०००
२०१८ १५,००० १५००- ४०००
२०१९ ४३,३७४ १२००-४०००
२०२० मार्केट बंद
२०२१ ००० २०००-४५००
चाैकट
दर कायम राहणे आवश्यक
कोकणातून १२ ते १५ हजार पेट्या आंबा वाशीमध्ये विक्रीला येत असला तरी अन्य राज्यातून १० ते १५ हजार क्रेट आंबा विक्रीला येत आहे. उत्पादन कमी असताना दर अद्याप टिकून आहेत. महागाईमुळे आंबा उत्पादन खर्चात वाढ झाली असून, दर शेवटपर्यंत कायम राहणे आवश्यक आहे. खासगी विक्रेते जाग्यावर ३५०० ते ४५०० रुपये दराने पेट्या खरेदी करीत असल्याने हमाली, वाहतूक खर्च वाचत असल्याने स्थानिक विक्री परवडत आहे.
चाैकट
अन्य राज्यांतील आंबा विक्रीला
कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश येथून केसर, बदामी, लालबाग, तोतापुरी, कर्नाटक हापूसची आवक सुरू आहे. केसर सध्या १०० ते १५० रुपये किलो, बदामी ६० ते ८० रुपये किलो, लालबाग ६० ते ७० रुपये किलो, तोतापुरी ३० ते ५० रुपये किलो, कर्नाटक हापूस १२० ते १६० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत.
चाैकट
उत्पादनात घट
गतवर्षी पाडवा २५ मार्च रोजी हाेता. मात्र, त्यावेळी मार्केट बंद होते. २०१९ मध्ये ४३,३७४ पेट्या विक्रीला होत्या. २०१८ ला १५ हजार, तर २०१७ ला ६० हजार पेट्या विक्रीला होत्या. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत आवक घटली आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे कमी प्रमाणात आंबा विक्रीला जाण्याची शक्यता आहे.
चाैकट
उष्मा वाढला
मे महिन्याप्रमाणे उष्म्याच्या झळा मार्चपासून सोसाव्या लागत आहेत. ३५ अंश सेल्सिअस कमाल, तर २८ अंश किमान तापमान असल्यामुळे ‘फळांचा राजा’ तयार होऊ लागला आहे. उष्म्यामुळे काही ठिकाणी आंब्यावर काळे डाग पडत आहेत. भाजलेला आंबा बाजारात चालत नाही. शिवाय कैरीही गळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दमट हवामानामुळे काही ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव झाला आहे. अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
कोट
यावर्षी हापूस उत्पादन कमी असल्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांच्या तुलनेत आवक घटली आहे. आखाती प्रदेश व युरोपमधून आंब्याला मागणी वाढत आहे. रमजानमुळे आंब्याला मागणी राहणार असल्याने दर बऱ्यापैकी टिकून राहतील. मात्र, गुढीपाडव्यानंतर आवक वाढण्याची शक्यता आहे.
- संजय पानसरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी.