हर्चे शेळवीवाडी १० दिवस अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:23 AM2021-05-28T04:23:59+5:302021-05-28T04:23:59+5:30
रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अनेक गावे, वाड्या अंधारात गेल्या होत्या. या वादळाने लांजा तालुक्यातील हर्चे ...
रत्नागिरी : ताैक्ते वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अनेक गावे, वाड्या अंधारात गेल्या होत्या. या वादळाने लांजा तालुक्यातील हर्चे गावातील शेळवीवाडीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ही वाडी गेले १० दिवस अंधारात आहे.
तौक्ते वादळामुळे मालमत्तांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे, वीजखांब कोसळल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा अंधारात बुडाला होता. अनेक गावांमध्ये घरांचीही पडझड झाली तर घरांच्या छप्परांवरील पत्रे, कौले उडाल्याने नुकसान झाले होते. अनेक गावे अंधारात बुडाल्याने महावितरणची धावपळ उडाली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम करुन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता. बहुतांश गावे, वाड्यांमधील वीजपुरवठा सुरु करण्यात महावितरणला यश आले होते.
दरम्यान, लांजा तालुक्याचे टोक असलेल्या हर्चे गावातील शेळवीवाडीत अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब वादळाने पडले होते. तसेच काही ठिकाणी विद्युत खांबांवर झाडांच्या फांद्या पडून तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे गेले १० दिवस ही वाडी अंधारात आहे. वाडीतील ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणशी संपर्क साधून वीजपुरवठा कधी सुरु होणार, याबाबत विचारणा केली असता, प्रयत्न सुुरु आहेत, असे सांगण्यात आले. वीज गायब झाल्याने मोबाईलही बंद पडले असून, अनेकांचा संपर्कही तुटला होता. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. दहा दिवस वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.