सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा
By admin | Published: September 3, 2016 11:02 PM2016-09-03T23:02:37+5:302016-09-04T00:43:16+5:30
नंदकिशोर जकातदार : ज्योतिष अभ्यास मंडळाचा रत्नागिरीत पदवीदान समारंभ
रत्नागिरी : ज्योतिषशास्त्र हे पूर्वापार चालत आलेले राजमान्य शास्त्र आहे. त्यामुळे ज्योतिषांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून समाजाला जागरूक करावे, असे प्रतिपादन पुण्याच्या वराहमिहीर ज्योतिष मुक्त विद्यापीठाचे कुलपती ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी येथे केले.
श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ व पुण्यातील वराहमिहीर ज्योतिष मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकताच पदवीदान समारंभ व व्याख्यानमाला झाली, त्यावेळी ते बोलत होते. जयेश मंगल पार्क येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी साई अनिरुद्ध सोसायटीच्या कार्याध्यक्षा जया सामंत म्हणाल्या की, स्पर्धेच्या युगामुळे प्रत्येकावर ताणतणाव आहे. त्यामुळे आपली आपणच काळजी घेतली पाहिजे. तसेच प्रत्येकाने स्वत:साठी १५-२० मिनिटे दिली पाहिजेत. त्यासाठी वेळ काढून योगासने, ध्यानधारणा करा, एकाग्र व्हा, आपली ऊर्जा आपणच तयार केली पाहिजे, आयुष्याकडे सकारत्मकतेने बघायला शिका, ज्योतिष हे महत्त्वाचे शास्त्र आहे, त्याचा करावा तेवढा अभ्यास थोडाच आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तुळजापूरच्या महाशक्तीपीठाचे डॉ. रंगनाथ नाथराव जोशी यांचेही व्याख्यान झाले. ते म्हणाले की, समाजव्यवस्था बदलण्याची ताकद ज्योतिष विषयात आहे. त्यातून सत्यम, शिवम, सुंदरम असे चित्र निर्माण होईल. यावेळी मंदरूळ (राजापूर) येथील सुनंदा विनायक नेवरे यांना कार्यगौरव पुरस्कार म्हणून प्रशस्तीपत्र व ५ हजार रुपये देण्यात आले. गतिमंद मुलांसाठी कार्यरत ‘आशादीप’ संस्थेला अर्थसहाय्य करण्यात आले. यावेळी झालेल्या व्याख्यानमालेत पुण्याच्या अॅड. मालती शर्मा यांचे वैवाहिक जीवनाची यशस्विता, सातारचे डॉ. विकास खिलारे यांचे शनिचे महत्त्व, नाशिकचे श्रीनिवास रामदास यांचे २१ व्या शतकात कर्जाचे महत्व व पुण्याचे सतीश मुंडलिक यांचे आधुनिक वास्तुशास्त्रवर व्याख्यान झाले. प्रसन्न मुळ्ये यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रेवती मेहेंदळे यांनी केले तर मधुरा चिंंचळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)